कर्जत : प्रतिनिधी
मतदान करणे आपले कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवून लोकशाहीचे जतन करा, असा सल्ला कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी येथे विद्यार्थ्यांना दिला. या वेळी त्यांनी प्रश्नोत्तरे घेऊन विद्यार्थ्यांची शाळाच घेतली.
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात तहसीलदार देशमुख बोलत होते. विद्यार्थ्यांनी चांगले नागरिक होण्याकडेही लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयीन विकास समिती सदस्य विजय मांडे यांचे समयोचित भाषण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनीषा चौधरी यांनी केले. नायब तहसीलदार सुधाकर राठोड, परिविक्षाधीन तहसीलदार प्रकाश मेहेत्रे, मंडल अधिकारी आप्पा राठोड, प्रा. निलोफर खान, प्रा. शिल्पा गजबे, प्रा. तनिष्का ठाकरे, रेवती देशपांडे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. प्रा. अमोल बोराडे यांनी आभार मानले.