Tuesday , March 28 2023
Breaking News

सडवलीच्या आदिवासी वस्तीशाळेला दरडीचा धोका

पोलादपूर तालुक्यात 40 शाळा इमारतींची दुरवस्था

पोलादपूर : शैलेश पालकर – तालुक्यातील सडवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वस्तीशाळा गेल्या आठवड्यापासून दरडीच्या भयाखाली असून मुख्याध्यापिका यांनी पोलादपूर पंचायत समितीला याबाबतचे लेखी पत्र देऊनही या घटनेचे गांभिर्य अद्याप प्रशासनाला उमगले नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पोलादपूर तालुक्यातील 40 शाळा इमारतींची तातडीने दुरूस्ती तर त्यापैकी 11 शाळांची पुनर्बांधणी आवश्यक असल्याची माहिती पोलादपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून देण्यात

आली आहे.

सडवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीत गावठाणातील प्राथमिक शाळेमध्ये 13 तर आदिवासी वस्ती शाळेमध्ये 34 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आदिवासी वस्ती शाळेत मुख्याध्यापिका प्राजक्ता मोरे आणि चिकणे या शिक्षिका आहेत. याच इमारतीमध्ये अंगणवाडीचे 5 बालकही बोबडे बोल शिकत आहेत.

गेल्या शुक्रवारी (दि. 5) संध्याकाळी शाळा सुरू असताना अतिवृष्टीदरम्यान एक दरड सडवली रस्त्यावरून घसरून, या वस्ती शाळेच्या भिंतीलगत येऊन थांबली. रविवारी (दि. 7) या शाळेलगतच्या आदिवासी वाडीतील दोन घरे अतिवृष्टीमुळे कोसळली असताना या वस्ती शाळेलगतच्या रस्त्यावरून मातीचे ढिगारे कोसळून शाळेच्या इमारतीच्या भिंतीवर येऊन दूर्घटना होण्याची शक्यता वाढली आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका मोरे यांनी तातडीने पंचायत समितीला लेखी अर्जाद्वारे शुक्रवारी दरड कोसळल्याची घटना कळवूनही अद्याप त्याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष दिले नाही.

पोलादपूर तालुक्यातील कालवली ऊर्दू, माटवण मराठी, ओंबळी धनगरवाडी, पायटेवाडी, केवनाळे, वडाचा कोंड, सवाद, पिंपळवाडी, कापडे बुद्रुक, फौजदारवाडी कापडे बुद्रुक, खांबेश्वरवाडी, धामणीचीवाडी, गोलदरा, ओंबळी, खांडज, देवळे, हळदूळे, कामथे, आडावळे बुद्रुक, आडावळे खुर्द, चिखली, चरई, लोहारे, चांभारगणी बुद्रुक, ढवळे, तळयाची वाडी, वडघर, फौजदारवाडी मोरगिरी, पार्ले, धारवली कोंड, गोळेगणी, बोरावळे, कोंढवी, भोगाव खुर्द, धामणदिवी, उमरठ, ढवळे, दाभिळ, करंजे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या चाळीस शाळागृहांची अवस्था फारच धोकादायक आहे. त्यापैकी लोहारे, वडाचा कोंड, पार्ले, माटवण मराठी, खांबेश्वरवाडी, धामणीची वाडी, उमरठ, आंबेमाची, हळदुळे, कामथे, चिखली या अकरा प्राथमिक शाळांच्या इमारतींची पुनर्बांधणी करण्याची तातडीने गरज आहे. या शाळांपैकी पायटेवाडी आणि आडावळे खुर्द या प्राथमिक शाळांच्या इमारतींनी यावर्षी शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र, पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांकडे आणि वर्ग खोल्यांकडे रायगड जिल्हा परिषदेकडूनच दूर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. पोलादपुर तालुक्यातील तब्बल 40 शाळांच्या इमारती मोडकळीस  आल्याने तेथे प्राथमिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह जिवितावरही टांगती तलवार असल्याचे दिसत आहे.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply