पनवेल ः बातमीदार
अतिपावसामुळे कोथिंबीरीचे मोठे नुकसान होत असून यामुळे अनेक ठिकाणी कोथिंबीरीची रोपे वाहून गेली आहेत तर अनेकठिकाणी पाणी लागल्याने कोथिंबीर सडू लागली आहे. त्यामुळे बाजारात सध्या कोथिंबीरीची आवक कमी झाली आहे. परिणामी बाजारात सध्या जास्तकाळ टिकणारी ’चायना कोथिंबीर’ दिसू लागली आहे. या कोथिंबीरीचे नाव जरी ’चायना कोथिंबीर’ असले तरी ही कोथिंबीर आपल्याकडेच पिकवली जाते. केवळ तिचे गुणधर्म ’चायनामेड’सारखे असल्याने तिला ’चायना कोथिंबीर’ म्हणून ओळखले जात आहे. मुंबईच्या घाऊक बाजारात नाशिक आणि पुणे नारायणगावमधून मोठ्या प्रमाणात कोथिंबीर येते. येथील देशी कोथिंबीर जशी चवीला उत्तम तसा तिचा सुगंधही आहे. मात्र सध्या अतिपावसामुळे कोथिंबीरीचे नुकसान झाल्याने कोथिंबीरीची आवक घटली आहे. नेहमी 50 ते 60 गाड्यांची होणारी आवक आता 30 ते 40 गाड्यांवर आली आहे. मागणी इतका पुरवठा होत नसल्याने बाजारात असलेल्या कोथिंबीरीला मोठी मागणी आहे. त्यामुळे दहा रुपयांना मिळणारी कोथिंबिरीची एक जुडी 40 ते 50 रुपये झाली आहे. कोथिंबीरीची ही मागणी पूर्ण करण्यासाठी आता व्यापार्यांनी इंदूरमधून कोथिंबीर मागविण्यास सुरुवात केली आहे. इंदूरवरून येणारी ही कोथिंबीर आकाराने मोठी असून ती पावसात जास्तकाळ टिकते. त्यामुळे व्यापारी ही कोथिंबीर मागवत आहेत. मात्र ही कोथिंबीर चवीला फारशी चांगली नसून तिला सुगंधही नाही. ही कोथिंबीर केवळ दिसायला चांगली आहे.