Breaking News

पनवेल तालुक्यातील सहा पुलांच्या कामाला मंजुरी

पनवेल : बातमीदार

पनवेल तालुक्यातील सहा पुलांच्या कामाला मंजुरी मिळाली असून, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यातील तीन ठिकाणचे जुने पूल पाडून त्या जागी नवीन पूल बांधण्यात येणार आहेत. एका ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार असून, दोन ठिकाणच्या पुलांची रुंदी वाढविण्यात येणार आहे. या पुलांसाठी तब्बल सव्वा पाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

पनवेलमधील अरुंद व कमी उंची असणार्‍या पुलांचा प्रश्न कित्येक वर्षांपासून सतावत होता. याचा त्रास वाहनचालक, येणारे-जाणारे नागरिक यांना सहन करावा लागत असे. उमरोली येथील कमी उंचीचा पूल, केवाळे येथील अरुंद पूल, कोंडीची वाडी येथील लोखंडी व धोकादायक असलेला पूल, स्वप्ननगरी-खानाव, महालुंगी, मोहोदर  येथील कमी रुंदीचे पूल यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी व इतर समस्यांना सामोरे जावे लागत असे. अखेर येथील सहा पुलांच्या कामाला मंजुरी मिळाली असून, लवकरच येथील कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एन. डी. पवार व राजीव डोंगरे यांनी दिली.

महाळूंगी येथे सद्यस्थितीत 6 बाय 2 मीटर गाळे असलेला व 12 मीटर लांबीचा व 5 मीटर रुंदीचा पूल आहे. या पुलाजवळ वळण असल्याने ते धोकादायक ठरत आहे. त्यामुळे हा जुना पूल पाडून येथे 12 मीटर लांबीचा व 8.25 मीटर रुंदीचा नवीन पूल बांधण्यात येणार आहे, तसेच येथील धोकादायक असलेले वळण काढले जाणार आहे. यासाठी 50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केवाळे येथील अरुंद ठरत असलेला पूलदेखील पाडण्यात येणार असून त्या ठिकाणी 10 बाय 3 मीटरचे गाळे ठेवण्यात येणार आहेत. 8.25 मीटरची रुंदी करण्यात येणार आहे.  यासाठी 1 कोटी 2 लाखांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.

स्वप्ननगरी (खानाव) व मोहोदर (चिंध्रण) येथील अरुंद असणार्‍या दोन्ही पुलांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या दोन्ही पुलांची रुंदी सद्यस्थितीत 5 मीटर असून, ही रुंदी 8.25 मीटर करण्यात येणार आहे. स्वप्ननगरी येथील पुलासाठी 40 लाख रुपये, तर मोहोदर येथील पुलाच्या रुंदीकरणासाठी 35 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांसाठी धोकादायक ठरत असलेला उमरोली पूलदेखील नवीन मंजूर करण्यात आला आहे. नाबार्डकडून उमरोली गावाच्या गाढी नदीवरील पुलासाठी 1 कोटी 45 लाख 14 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. उमरोलीचा जुना पूल पाडण्यात येणार असून, नवीन पुलासाठी 10 बाय 10 मीटरचे 6 गाळे ठेवण्यात येणार आहेत. मालडूंगे ग्रामपंचायतच्या हद्दीत येणार्‍या कोंडीची वाडी या आदिवासी वाडीसाठी सिमेंट काँक्रीटचा पूल मंजूर करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागाकडून या पुलासाठी 1 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासूनचा येथील आदिवासी बांधवांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या पुलासाठी 10/10 मीटर लांबी व 5 मीटर रुंदीचे 6 गाळे ठेवण्यात येणार आहेत.

स्वप्ननगरी (खानाव) व मोहोदर (चिंध्रण), केवाळे, महाळूंगी अशा चार पुलांची कामे राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आली असून त्यांची वर्कऑर्डर आली आहे. 10 जानेवारी 2019 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. कंत्राटदार के. एन. घरत यांना काम देण्यात आले आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply