Breaking News

‘कंपोस्ट पिट’ची सक्ती त्रासदायक; नवी मुंबईतील कचरा प्रकल्पामुळे नागरिक त्रस्त

नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी

सोसायट्यांना कंपोस्ट पिट प्रकल्प पालिकेने उभारण्याची सक्ती केल्याने नागरिकांमधून संतापाच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. कंपोस्ट पिट प्रकल्पाबाबत पालिकेने सक्ती करू नये  अशी लेखी मागणी भाजपाच्या युवती मोर्चाच्या अध्यक्ष सुहासिनी नायडू यांनी सोमवारी आयुक्तांकडे केली आहे. नेरूळ प्रभाग क्रमांक 31 मधील सेक्टर 4 येथील सर्व सोसायटी रहिवाशांना स्वच्छ भारत अंतर्गत ओल्या कचर्‍यापासून खत निर्मिती प्रकल्प उभारण्याची सक्ती करण्यात आली आहे. विभाग अधिकार्‍यांकडून कचरा उचलला जाणार नाही तसेच पाण्याची लाईन तोडू असे इशारे रहिवाशांना दिले आहेत. याबाबत भाजपच्या नायडू व रहिवाशांनी आयुक्तांची घेत नागरिकांच्या अडचणी मांडल्या. मुळात या सोसायट्या सिडकोच्या असल्याने यात पार्किंग व्यतिरिक्त जागा उरलेली नाही. त्यात वाहनांची संख्या वाढल्याने अनेक रहिवाशांना नाईलाजास्तव सोसायटीबाहेर वाहने उभी करावी लागत आहेत. त्यात पालिका कम्पोस्ट पिट उभारण्याची सक्ती करीत आहे हे कितपत योग्य आहे, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. नुकतेच कोविडमधून नागरिक बाहेर पडत असून नागरिक आर्थिक विवंचनेतून बाहेर पडू लागले आहेत. अनेक नागरिकांनी कोविड काळात मेंटेनन्स भरलेले नाहीत. त्यात पालिका कंपोस्ट पिटबाबत सक्ती करत असल्याने सोसायट्यांना भूर्दंड भरावा लागणार आहे. अन्यथा मेंटेनन्स वाढवण्याशिवाय सामान्य नागरिक राहत असलेल्या सोसायट्यांना पर्याय उरणार नाही. पालिका स्वच्छ सर्वेक्षणात नवे काहीतरी प्रयोग करत असल्याचे दाखवण्यासाठी नागरिकांना वेठीस धरत आहे का? असा प्रश्न नायडू यांनी उपस्थित केला. कंपोस्ट पिट उभारताना जागा, मनुष्यबळाची व्यवस्था करावी लागणार आहे. तर दुसरीकडे कंपोस्ट पिटमधून येणार्‍या दुर्गंधीच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. अशात तसेच डासांचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पालिकेच्या हट्टापायी हा सर्व त्रास नागरिकांनी का सोसायचा असा प्रश्न नायडू यांनी उपस्थित केला. या वेळी सनराइज् अपार्टमेंटचे अध्यक्ष कृष्णा पुजारी, सप्तश्री सोसायटीच्या अध्यक्षा देविका मिश्रा, न्यू हेवेंस सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत धावडे, सागर संगम अपार्टमेंटचे सेक्रेटरी चंद्रकांत लालजी, शिव पाम बीच सोसायटीच्या अध्यक्ष हेमलता ठाकूर, राजश्री भट, सीमाजी, राजेश, कविता पुजारी व सहकार सेल अध्यक्ष प्रमित शरण आदी मान्यवर उपस्थित होते.

आम्ही नागरिक म्हणून पालिकेला सहकार्य करीत आहोत. आमच्या जागेत हा प्रकल्प उभारण्याऐवजी पालिकेने अशा जागा निर्माण कराव्यात व त्या ठिकाणी पालिकेने खर्च करून हे प्रकल्प राबवावेत. आम्ही त्यांना सहकार्य करू. आयुक्त बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकार्‍यांना जागेची पाहणी करून योग्य पाऊल उचलण्याचे आश्वासनही दिले आहे.

-सुहासिनी नायडू, अध्यक्ष, भाजप महिला मोर्चा 

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply