अविनाश धर्माधिकारी यांच्याकडून यशाची त्रिसूत्री
पनवेल : बातमीदार
प्रत्येक जण बुद्धिवान आहे, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. त्यामुळे स्वतःला ओळखा, त्यानंतर क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा निर्माण करा. ही यशस्वी जीवनाची त्रिसूत्री चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितली, तसेच त्यांनी योगा करण्याचा सल्ला दिला. ते आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
रोटरी व रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल मिडटाऊन आणि पनवेल महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी आणि पालकांसाठी करिअर मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी अविनाश धर्माधिकारी व डॉ. कौस्तुभ धारवळकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास महापौर कविता चौतमोल, रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनच्या अध्यक्षा संजीवनी मालवणकर, युथ डायरेक्टर श्रीकांत लिमये, प्रोजेक्त चेअरमन योगिता देशमुख, सेक्रेटरी प्रसाद देशमुख, दिवाकरन पिल्ले, वसंत गद्रे आदी उपस्थित होते. सोशल इन्होवेशन या विषयावर उत्कृष्ट प्रकल्प सादर केलेल्या तिघांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. माणसाची उंची पुरस्काराने मोजू नका; तर ज्या माणसाला पुरस्कार दिला आहे त्या माणसामुळे पुरस्काराची उंची वाढली तो माणूस मोठा आहे, असे सांगून अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, रायगड हा माझा जिल्हा आहे. कारण मी या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी होतो. जुन्या आठवणी सांगताना वेळेपूर्वी पूर्ण झालेला प्रकल्प म्हणजे कोकण रेल्वे असून, या प्रकल्पात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजे सर्वकाही नाही, असे सांगत त्यांनी आजही सुशिक्षित बेरोजगारी इंजिनिअर्समध्ये दिसत असल्याचे सांगितले; तर ज्याचा मेंदू शाबूत आहे तो माणूस बुद्धिवान असतो, असे मत व्यक्त केले.संधी कुठे आहेत आणि कशा शोधायच्या याबाबत कौस्तुभ धारगळकर यांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाजात संधी असतात. त्या आपण शोधून काढायच्या व संधीचे सोने करायला हवे, असे मत धारगळकर यांनी मांडले. पहिल्यांदाच हा कार्यक्रम पनवेलमध्ये झाला असून, असा कार्यक्रम दरवर्षी करणार असल्याचे संजीवनी मालवणकर यांनी सांगितले. या वेळी फडके नाट्यगृह खचाखच भरले होते. रोटरी क्लब व रोट्रॅक्टचे सदस्य, विद्यार्थी, पालक यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.सकाळी 9 ते 1च्या दरम्यान यंग सोशल इन्होव्हेटिव्ह अॅवॉर्डच्या स्पर्धा नवीन पनवेल येथे झाल्या. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःहून स्वतःच्या कल्पना वापरून ज्याचा सोसायटीला उपयोग होईल असे प्रकल्प यात विद्यार्थ्यांनी बनवले. यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी खारघर येथील निकेश नागदेवते हा विजेता ठरला. त्याने पेंढ्यावर घरगुती ग्रामीण उद्योग कसा होऊ शकतो यावर प्रयोग सादर केला. दुसरा क्रमांक पटकावलेल्या भारतीय विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेलापूर येथील तेजस गांगन याने सोलर वॉटर फिल्टरवर प्रकल्प मांडला; तर तिसरा क्रमांक सीकेटी खांदा कॉलनी येथील सृष्टी कुलकर्णी हिला मिळाला. 96 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.