Breaking News

जि. प. शाळांना लागली गळती

कोतवालवाडी, ऐनाचीवाडीतील इमारती मोडकळीस; विद्यार्थ्यांचे हाल

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायत हद्दीतील कोतवालवाडी आणि नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील ऐनाचीवाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती गळू लागल्या आहेत. दरम्यान, त्या दोन्ही आदिवासीवाडीत शाळा भरविण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. कोतवालवाडीमध्ये रायगड जिल्हा परिषदेची इयत्ता चौथीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. त्या शाळेत 20 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना शिकविण्यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने केली आहे. त्या ठिकाणी असलेल्या शाळा इमारतीमधील दोन्ही वर्गखोल्यांचे बांधकाम नित्कृष्ट करण्यात आल्याने पावसाच्या पाण्याची गळती वर्गखोल्यांत सुरू झाली आहे. गळतीचे प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात असल्याने वर्गात पाणीच पाणी साचून राहिले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  ऐनाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारतदेखील गळकी बनली आहे. त्या शाळेत चौथी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या 26 विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही. त्यामुळे तेथे असलेले दोन्ही शिक्षक हैराण झाले असून, विद्यार्थ्यांना बसवून त्यांच्याकडून कसा अभ्यास करून घ्यायचा? या विवंचनेत शिक्षक आहेत.  ऐनाचीवाडीमधील शिक्षकांनी आपल्या शाळेच्या इमारतीला प्लास्टिक कापड लावून पावसाळ्यातील पाण्याची गळती रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही पाणी आत येऊन दोन्ही वर्ग खोल्यांमध्ये पसरले आहे. ऐनाचीवाडी आणि कोतवालवाडी या दोन्ही आदिवासीवाड्यांमध्ये शाळा भरविण्याएवढी अन्य जागा उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठे बसवून शाळा सुरू ठेवावी, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. तर एका ठिकाणी असलेले समाज मंदिर हे ग्रामस्थांनी सार्वजनिक भांडी भरून ठेवल्याने तेथे जागा निर्माण करण्याचा प्रयत्नदेखील संपला आहे.

ऐनाचीवाडी आणि कोतवालवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सर्व वर्गखोल्यात पाणी साचले असल्याचे दिसून आले. तेथील शिक्षकांनी यापुर्वीच शिक्षण विभागाला पावसाचे पाणी आतमध्ये येऊन विद्यार्थ्यांना बसायला अडचणी निर्माण होतील, याची माहिती दिली होती, तरीदेखील शाळा इमारतीची दुरुस्ती करण्याचा विषय पुढे सरकला नसल्याने आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांवर कुठे बसायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

-जयवंती हिंदोळा, सदस्या, कर्जत पंचायत समिती

ऐनाचीवाडी आणि कोतवालवाडी येथील शाळा इमारतींची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी, अशी सूचना दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांकडून आल्याने आम्ही त्याबाबत बांधकाम विभागाला कळविले होते.

-जी. बी. हिवरे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, कर्जत

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply