![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/07/nivedan-1024x429.jpg)
पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे. साहित्य आणि समाजकारण यात त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग होता. अशा या महापुरुषाला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका संतोषी तुपे आणि विविध संघटनांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
मागास समाजातून पुढे आलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या प्रतिभावंत लेखणीतून दीन-दुबळ्या, शोषित, पीडित, उपेक्षित, वंचित घटकांतील सामान्य जनतेच्या व्यथा, वेदना आपल्या साहित्यातून जगासमोर परिणामकारकरीत्या मांडल्या. साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता 1 ऑगस्ट रोजी होत आहे. त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल जनतेतून व लोकप्रतिनिधींकडून भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान त्यांना देण्याची मागणी होत आहे. त्या अनुषंगाने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी आपणाकडून शिफारस करण्यात यावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी सावित्री गुलाब तुपे सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष रमेश तुपे, खारघर शहर राष्ट्रवादी अध्यक्ष बळीराम नेटके, आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना गायकवाड, क्रांतिवीर लहुजी शक्तीसेनेचे अध्यक्ष हरेश नेटके, लोकपरिषद आश्रय सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक गायकवाड, संतोष ढोबळे, प्रदीप वायदंडे, स्वप्नील जाधव, कन्हय्या कांबळे, प्रवीण कांबळे, संतोष नागमोडे, पप्पू साळवे, रूपेश खुडे आदी उपस्थित होते.