नवी मुंबई : बातमीदार
ऐरोली गाव ग्रामस्थ मंडळ आणि आगरी-कोळी युथ फाऊंडेशनच्या ऐरोली टीमच्या संयुक्त विद्यमाने ऐरोली गाव गावदेवी मैदान येथे भूमिपूत्र चळवळीला शुक्रवारी (दि. 15) सुरुवात झाली.
ग्रामसभेसाठी विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षण, प्रॉपर्टी कार्ड आणि त्याचा ग्रामस्थांच्या अस्तित्वाशी असलेला संबंध हा विषय तांत्रिक दृष्ट्या प्री मिटिंगमध्ये समजावून सांगण्यात आला. विस्तारित गावठाणातील सिटीसर्वेक्षण आणि प्रॉपर्टी कार्डचे महत्व, प्रॉपर्टी कार्ड शिवाय क्लस्टर योजना राबविण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे धोके, तसेच ह्यासंदर्भात झालेले आतापर्यंतचे शासकीय निर्णय याची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रॉपर्टी कार्ड चा विषय आता अंतिम टप्प्यात असल्याने त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व ग्रामस्थांना सर्व राजकीय बंधने झुगारून फक्त भूमिपुत्र म्हणून एक होण्याची आवश्यकता असल्याने ऐन निवडणुकीच्या काळात एक होण्याचे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले. भुमीपुत्र एक न झाल्यास फाउंडेशन गावठाण चळवळ बंद करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा हि ह्यावेळी फाउंडेशन तर्फे देण्यात आला. या आवाहनास ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत ऐरोली गाव राजकीय बंध झुगारून एक होणार अशी ग्वाही दिली. ग्रामसभेला उपस्थित राजकीय पक्षांनी भुमीपुत्र म्हणून एकजुटीने उभे राहण्याची ग्वाही दिली.