Tuesday , March 28 2023
Breaking News

मुरूड नाला बांधकाम प्रकरण ; जिल्हाधिकार्यांच्या आदेशाची प्रतीक्षा

मुरूड : प्रतिनिधी

जिल्हाधिकार्‍यांनी लोकहितार्थ उचित निर्णय घेण्याचे निर्देश देऊनही मुरूड नगर परिषदेने शहरातील शेगवाडा येथील नाल्यावरचे बांधकाम तोडण्यास असमर्थता दर्शविली आहे. नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत नाल्यावरील बांधकाम तोडण्याकरीता जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्ट आदेश मिळावेत, यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव सर्वानुमतेे पारित करण्यात आला आहे.मुरूड शहरातील शेगवाडा येथील नाल्यावरचे बांधकाम तोडण्यात यावे, यासाठी त्या परिसरातील नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यावेळी भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या प्रयत्नातून जिल्हाधिकार्‍यांनी मुरूड नगर परिषदेस पत्र दिले होते. त्यात लोकहितार्थ उचित निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर नगर परिषदेच्या सभेत नाल्यावरील बांधकाम तातडीने तोडण्याचा ठराव पारित करण्यात येईल, असे नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी जाहीर केले होते. त्यामुळे समाधान झालेल्या उपोषणकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 5) संध्याकाळी बेमुदत उपोषण सोडले होते.

दरम्यान, नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगर परिषदेच्या सभेत जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या पत्रात नाल्यावरील बांधकाम तोडावे असे स्पष्ट आदेश नाहीत. त्यामुळे नाल्यावरील बांधकाम तोडण्याचे स्पष्ट आदेश मिळावेत याकरिता  जिल्हाधिकार्‍यांबरोबर पत्रव्यहार करण्याचा ठराव पारित करण्यात आला.

– सर्व नगरसेवक शेगवाडा परिसरातील नागरिकांच्या सोबत आहेत, मात्र कायदेशीर अडचणीमुळे नाल्यावरील बांधकाम तोडता येत नाही. हे बांधकाम तोडण्याचे स्पष्ट आदेश मिळविण्यासाठी जिल्हाधिकर्‍यांकडे तातडीने पाठपुरावा करण्यात येईल.

-दयानंद गोरे, मुख्याधिकारी, मुरूड नगर परिषद

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply