Breaking News

भाजप-शिवसेना महायुतीने करून दाखवलं!

समोरच्या माणसाला कमी लेखायचं, त्याला काहीच कळत नाही, जे कळतं ते केवळ आणि केवळ मलाच, असा स्वतःच्या मनात (आणि स्वतःबद्दल) गैरसमज करून घ्यायचा. किंबहुना आम्ही केलंय तेच बरोबर दुसर्‍याने केलंय ते सर्वथा चूकच, अशी प्रवृत्ती आजकाल राजकारण्यांमध्ये आणि पत्रकारितेत वाढू लागली आहे की काय असं वाटतं. पत्रकारिता करताना आपण ’नीरक्षीरविवेकेन’ असा मापदंड लावायचा जणू विसरलोय, असंच दिसून येतंय. आदित्य ठाकरे यांनी एक महत्त्वाचे विधान केलंय ते दुर्लक्षित करून चालणार नाही किंबहुना तेच यापुढे महत्त्वाचे ठरणार आहे. यापुढे डावी आणि उजवी विचारसरणी अस्तित्वात राहणार नाही, यापुढे युवा पिढी ही विकासावर आधारित राजकारण आणि समाजकारणावर भर देईल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

साधारण 17-18 वर्षांपूर्वी गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी सत्तेच्या राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी हे करून दाखवलं! 2002 साली नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी ते हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखले जात होते, पण त्यानंतर त्यांनी विकासावर आधारित राजकारण करून 12 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषविले. त्यामुळेच गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचा जनाधार वाढला आणि टिकला. 2012 साली ते जेव्हा पुन्हा निवडून आले तेव्हा त्यांनी धशी, ख रा ींहश उ च्, उच् चशरपी उेाोप चरप! होय मी सामान्य माणूस आहे, असं त्यांनी निक्षून सांगितले होते. सत्तेची मस्ती नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात गेली नव्हती आणि 2014 साली 130 कोटी जनतेच्या प्रधानसेवकाची भूमिका स्वीकारून तिथेही त्यांनी करून दाखवलं! त्यामुळेच 2019च्या नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 282वरून 303वर उडी मारू शकला.

अमर्याद सत्ता हाती घेऊनसुद्धा नरेंद्र मोदी यांची नाळ मातीशी कायम आहे. जात, पात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन नरेंद्र मोदी यांनी सब का साथ, सब का विकास, या आपल्याच सूत्राचा सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास असा विस्तार केला. ’रिकाम्या हाताला काम आणि रिकाम्या पोटाला अन्न’ या बाळासाहेब ठाकरे यांच्या खर्‍याखुर्‍या समाजवादी संकल्पनेला पुढे नेण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी हाती घेतले आहे. त्यामुळे तथाकथित समाजवाद्यांचा थयथयाट होणं स्वाभाविक आहे. भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना 10 टक्के आरक्षण देऊन बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका केवळ स्वीकारलीच नाही तर ती अमलातही आणून ’करून दाखवलं!’. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीने नरेंद्र मोदी यांचा कित्ता जसाच्या तसाच गिरवत शिवशाही-2 सरकार पढे नेताना शिवशाही-3ची योग्य ती तजवीज करण्यासाठी कंबर कसली आहे.

मुंबई महापालिकेच्या 2012च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात ’बेस्ट’च्या बसचे भाडे एक रुपयाने कमी करण्यासाठी प्रस्ताव तयार केला, पण तो आचारसंहिता आल्यामुळे निवडणुकीनंतर अमलात आला. आता याच बेस्ट बसचे (साध्या) किमान भाडे तीन रुपयांनी कमी करून ते पाच रुपये ’करून दाखवलं’ आणि वातानुकूलित बसचे किमान भाडे सहा रूपये ’करून दाखवलं!’ या भाडेकपातीला राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी तत्काळ मान्यता दिली. गेल्याच महिन्यात परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मुंबई ते पुणे या शिवनेरी आणि अश्वमेध या आलिशान बसचे भाडे 80 ते 120 रुपयांनी कमी ’करून दाखवलं!’ एकदा कोणत्याही किमतीत वाढ झाली की ती कमी होण्याची शक्यता नसते हा आजवरचा इतिहास आहे. महागाई ही सतत वाढतच जाते ती कमी होण्याचं नाव घेत नाही, पण राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने आणि शिवसेना-भाजप युतीच्या अधिपत्याखाली असलेल्या मुंबई महापालिकेच्या राजवटीनं महागाई कमी होऊ शकते हे

’करून दाखवलं!’ पण ज्यांच्या डोळ्यांवर पूर्वग्रहदूषित चष्मे आहेत त्यांना हे एकतर दिसणार नाही किंवा त्यांना ते सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. दिवाकर रावते हा प्रचंड झपाटून काम करणारा माणूस. परिवहनमंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या खात्यात त्यांनी जो आमूलाग्र बदल घडवून आणला आहे की त्यामुळे आज हे खाते लोकांना दिसू लागलंय आणि या त्यांच्या सर्व उपक्रमांना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून जसा उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण पाठिंबा दिला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळेच रावते यांना ’करून दाखवलं!’ असं म्हणण्यासाठी पाठबळ मिळालं.

दिवाकर रावते यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत जे लोकाभिमुख, प्रवाशांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत त्यामुळे आणि भाडेकपातीच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयामुळे गाव तिथे धावणारी एसटी ही महाराष्ट्रात 70 वर्षांपूर्वी सुरू झालेली सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली ’लालपरी’ प्रवाशांच्या मनात घर करून बसली आहे, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

प्रमोद नवलकर या ’भटक्याची भ्रमंती’ फेम अवलियाने एसटी नावारूपाला आणली आणि आज शिवशाही-2मध्ये दिवाकर रावते यांनी एसटीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. (शिवशाही-1मध्येही काही काळ दिवाकर रावते हे परिवहनमंत्री होते.) शिवनेरी, अश्वमेधबरोबरच शिवशाही, हिरकणी, विठाई अशा विविध प्रकारच्या बसेस रस्त्यावर आणून प्रवाशांना सार्वजनिक उपक्रमांकडे वळविण्याचे शिवधनुष्य दिवाकर रावते यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने लीलया पेलले आहे. एसटी कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या परिवाराला एसटी आपलीच वाटावी यासाठीसुद्धा परिश्रम घेताना कर्मचार्‍यांच्या मुलांना नोकर्‍यांमध्ये सामावून घेण्यासाठी क्रांतिकारक निर्णय घेतला. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला आणि त्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. त्याची अंमलबजावणी दिवाकर रावते यांनी सर्वात आधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागातून ’करून दाखवली!’ हे सारे विस्ताराने सांगण्याचा खटाटोप यासाठीच मी ’करून दाखवतोय’, कारण काही महाभाग असे आहेत की त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याची नितांत गरज आहे.

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर विराजमान झालेल्या प्रवीण परदेशी या ज्येष्ठ आणि कर्तबगार सनदी अधिकार्‍यांनी बेस्ट भाडेकपातीचा प्रस्ताव आणला, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, पण हा प्रस्ताव मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) समितीच्या बैठकीत तसेच मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता मिळाल्यानंतर राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी झटपट मंजुरी दिली आणि मग तो अमलात आला. ही सर्व प्रक्रिया लोकशाही मानणार्‍या नेते, पुढारी, राजकारणी आणि माध्यम, समाजमाध्यमातून सेकंदा सेकंदाला आणि मिनिटा मिनिटाला (डोकं न वापरता) कार्यरत राहणार्‍या तथाकथित बुद्धिवंतांना माहीत असेलच असे वाटते. अर्थात ही माहिती असूनही जाणीवपूर्वक त्याकडे कानाडोळा जर कुणी करीत असतील तर मात्र देव त्यांचे भले करो. दगडावर डोकं आपटलं तर दगड फुटणार की डोकं? हे माहीत असताना दगडावर डोकं आपटाच कशाला? बरोबर ना? एक मात्र खरंय की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीने करून दाखवलं! महागाई कमी होते हा इतिहास घडवून एक आशादायक धाडसी पाऊल भाजप आणि शिवसेना महायुतीने उचलल्याबद्दल देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि दिवाकर रावते यांसह मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, बेस्ट अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply