Breaking News

इंडिया स्टील कंपनी रहिवाशांच्या मुळावर

5 जुलै 2013ची रात्र. खोपोलीतील विहारी, सिद्धार्थनगर, मोहनवाडी, प्रकाशनगर, विहारी ठाकूरवाडीतील रहिवासी रात्रीचे जेवण केल्याने काही झोपण्याच्या तयारीत तर काही दिवसभर काबाडकष्ट करून दमलेभागल्याने अंथरुणावर पडल्या पडल्या झोपी गेलेले, तर काही जागे असूनही झोपलेले, काही दुसर्‍या पाळीतील कामगार घरी येणार असल्याने वाट पाहत घरातील गुजगोष्टीत मग्न असलेले. या परिसरातील बहुतेक रहिवासी काबाडकष्ट करणारे कामगार. ठाकूरवाडीतील नागरिक मोलमजुरी करणारे. याच गावात रात्री 11 वाजून 25 मिनिटांनी जीवाचा थरकाप उडावा असे दोन भयाण स्फोट झाले. महाकाय भूकंप व्हावा असा धुडूमधूम आवाज. गावात एकच आरडाओरड, भयाण किंचाळ्या व मदतीच्या आवाजाने संपूर्ण खोपोली परिसरातील रहाटवडे, भानवज, वरची खोपोलीचे नागरिक मदतीला धावले. याआधी पाच-सहा  वर्षात असे 15-20 स्फोट झालेही होते, मात्र नागरिक त्या स्फोटाच्या आवाजाने घराबाहेर येत कानोसा घेत झोपी गेलेले, मात्र त्या रात्रीच्या स्फोटाने तब्बल 25 घरांचे नुकसान झाले. कोणाचे पत्रे फुटले, कोणाचे घर कोसळून पडले, तर कोणाच्या घराच्या भिंती कोसळून घरातील संसारोपयोगी वस्तू नेस्तनाबूत होत संसारच उघड्यावर आले.

13 घरातील नागरिक मार लागल्याने मदतीच्या हाका मारीत तीव्र वेदनेने विव्हळत बसलेले. दीड वर्षाच्या लहानापासून ते 67 वर्षांच्या आजोबांसह जखमी झाल्याने मदतीच्या प्रतीक्षेत असलेले. गावाचे श्रद्धास्थान असलेल्या बापदेव मंदिरालाही स्फोटाची झळ पोहचत मंदिराचे अतोनात नुकसान झालेले. काहींच्या घराच्या छपराच्या पत्र्यावर लोखंडी धातू त्याला काही स्लग ीश्रररस म्हणतात. 3 ते 4 किलोचे कोसळून काही जखमी झालेले. यामध्ये दीड वर्षाचा चिमुकला समर्थ वाघुले, कृष्ण वाघुले, दत्ता फराट, प्रशांत वाघुले व 11 असे जखमी  झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गावातील तरुण आक्रोशाच्या आवाजाने संतप्त झाले.

20-25 जणांचा घोळका जमा झाला. विहारी गाव व आसपासचे पुरुष यात सहभागी झाले. एरवी धुराच्या प्रदूषणाने तसेच दररोजच्या कारखान्यातील लोखंडाच्या आवाजाने कानाडोळा करणारे तरुण द्वेषाने पेटून उठले. कंपनी बंद झालीच पाहिजेची हाक देण्यात आली. काही तरुण कारखान्यावर चालून गेले. सकाळ होताच खोपोली बाजारपेठेतील व्यापार्‍यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. गावकर्‍यांनी खोपोली पोलीस स्टेशनला इंडिया स्टील जुने नाव आयएसआरविरोधात तक्रार दाखल केली. जमावावर लाठीचार्ज झाला. जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला.  कारखाना व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला, तर ग्रामस्थ किशोर साळुंखे, उमेश शिंदे, पुनर वाघुले, कृष्णा वाघुले, निलेश गुणीजन, दीपक जैस्वाल, सचिन फराट, अशोक साळवी, प्रमोद पवार, तन्ना, गणेश रासम यांच्यासह किरण रासम व अशोक साळवी हे परदेशातून आलेले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने कायमचे नोकरीस मुकावे लागले आहे. खालापूर न्यायालयात सहा वर्षांनंतर दाव्याचा निकाल लागला. सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली, मात्र दोन जणांना परदेशातील नोकरी गमवावी लागली. गावातील बापदेव मित्र मंडळाने शासनाचे दरवाजे ठोठावले. तत्कालीन उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी गावकरी व व्यवस्थापन यांच्यासह संबंधित अधिकार्‍यांच्या भेटीत कारखाना व्यवस्थापकाला इशारा दिला. गावकर्‍यांना त्रास असेल तर ताबडतोब कारखाना बंद करण्यात यावा. त्यावेळी कारखाना व्यवस्थापकाने चुका सुधारून संरक्षित भिंत बांधून गावातील नुकसान भरपाई देऊ तसेच जखमी दीड वर्षाच्या मुलाचा खर्च उचलण्याची हमी दिली. गावकर्‍यांचे समाधान झाले.

8 ऑगस्ट 2013 रोजी तहसीलदार, खोपोली नगराध्यक्ष, ग्रामस्थ, औद्योगिक सुरक्षा, उपसंचालक यांनी कारखान्यास भेट देऊन ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. यामध्ये कारखान्याने गावकर्‍यांच्या सर्व अटी मान्य करीत 30 नोव्हेंबर 2013पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले, मात्र अधिकार्‍यांची पाठ फिरताच कारखाना व्यवस्थापकानेही गावकर्‍यांना पाठ दाखवली. काही वर्षे लहानसहान घटना घडल्या. कामगारांना इजा होणे, शेडच्या पत्र्यावरून पडून कामगार ठार होणे, कामगारांना मार लागल्यास स्थानिक ठिकाणी कोणतीच खबर लागू न देता मुंबई किंवा बाहेर ठिकाणच्या रुग्णालयात कामगार दाखल करण्यात येऊ लागले. कारखान्याचे दूषित

सांडपाणी रात्रीच्या वेळेस नदीपात्रात सोडणे, पावसाळ्याच्या पाण्याचा फायदा घेत दूषित पाणी नाल्यात सोडणे असा पराक्रम सुरूच आहे. हवेतील प्रदूषण हा हक्काचा कार्यक्रम सुरू आहे. या प्रदूषणाने सर्दी खोकला, दमा, क्षयरोग यांसारखे रुग्ण आढळत आहेत.

खोपोलीत 500च्या आसपास क्षयरोगाचे रुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः गावातील 1955 सालापासून सुरू असणारी देवलाड शाळा ही अवघी 30 फूट अंतरावर असताना कारखान्याला परवानगी मिळालीच कशी, असा सवाल केला जात आहे आणि शाळेची इमारत कारखान्याच्या अनेक वेळा होणार्‍या धमाक्याने जीर्ण झाली असून मागील दीड वर्षापासून नगरपालिका हद्दीतील देवलाड विहारी  शाळा बंद अवस्थेत असल्याने विहारी ठाकूरवाडी विहारी गाव येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या विद्यार्थ्यांना तब्बल दोन किमीचा पायी प्रवास करीत रहाटवडे येथील शाळेत जावे लागत आहे. शिक्षण मंडळ शाळा मोडकळीस आल्याचे सांगत असले तरी दीड वर्षात शाळा दुरुस्त करता आली नसती का, असा सवाल उपस्थित होत आहे.

विहारी हे गाव ज्येष्ठ लेखक र. वा. दिघे व ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते माधव मोकाशी यांचे गाव म्हणून महाराष्ट्रात परिचित. या गावाला शाळाच नसणे हा लाजीरवाणा प्रकार आहे. कारखान्यात स्थानिकांना नोकर्‍या नाहीत, मात्र 90 टक्के परप्रांतीयांना प्राधान्य, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न भेडसावणारा, कामगार कायद्याची सर्रास पायमल्ली, कधी धमाका होईल याचा नेम नाही आणि दुर्घटना घडलीच तर परप्रांतीय कामगारांना वालीच नाही अशी अवस्था असल्याने सर्वच आलबेल स्थिती. कारखाना आहे की मृत्यूचे जाळे, असा संभ्रम निर्माण होणारे गोदाम. त्यामध्येच दिनांक 11 जुलै 2019 रोजी मध्यरात्री सव्वाएक वाजता सलग तीन स्फोट झाले. लोखंड वितळवणारी भट्टी कोसळून पडल्याने कारखान्यात आग लागली. या स्फोटाने कंपनी परिसरासह 100 मीटर अंतरावर असणारे विहारी गाव, मोहनवाडी, सिद्धार्थनगरसह पूर्ण खोपोली हादरली. घराचे दरवाजे व खिडक्यांच्या काचा कोसळल्या.

भूकंपासारखा हादरा झाल्याने रहिवासी  भयभीत होत सैरावैरा पळू लागले, मात्र इंडिया स्टीलमध्ये स्फोट झाल्याचे निष्पन्न झाल्याने भीतीच्या छायेत पूर्ण रात्र जागून काढली. कारखान्याने हे मान्य केले नाही. हा स्फोट विजेच्या जनित्राचा झाल्याचा दावा केला आहे. ग्रामस्थांना हा दावा मान्य नाही. 13 एप्रिल 2019 रोजी रात्रीच्या सुमारास असाच स्फोट झाला होता. भेदरलेले ग्रामस्थ  गाव सोडण्याच्या तयारीत आहेत. विहारी व मोहनवाडी या गावांना लागूनच या कारखान्याची भिंत असून लोखंड वितळणारी भट्टी अवघ्या 100 मीटर अंतरावर आहे. आमच्या जीवितास स्थानिक प्रशासन जबाबदार असेल, असा सूर निघत आहे. मुंबईतील काँग्रेसचा  कामगार  नेता 90 टक्के परप्रांतीय कामगारांच्या नोकरीची ढाल करीत स्थानिक गावकर्‍यांच्या जीविताची पर्वा न करता कारखान्याची बाजू  घेत आहे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. टाकावू लोखंडाची कच लाखो टन साचली आहे. महसूल खात्याचे त्याकडे दुर्लक्ष आहे.

कारखान्यात स्फोट होतात. अग्निशमन दल आग विझवते. शासकीय बाबू पंचनामा करतात. प्रदूषण मंडळाचे अधिकारी येतात. निघताना हसत खेळत पोटावर ताव मारीत उंच हाताने टाटा, बाय बाय करीत मोटारीने माघारी जातात. कित्येक वर्षे जैसे थे परिस्थिती. यावर कायमचा तोडगा काढण्याचा इरादा गावातील किशोर साळुंखे, निलेश मोडवे, संजय कचरे, विजय घरडे, अशोक साळवी, सचिन यादव यांच्यासह ग्रामस्थांनी केला असून एकजूट होत येत्या चार-पाच महिन्यांत जनआंदोलनाचे नारे देण्याचा निर्णय घेतला जात आहे.

-अरूण नलावडे, फिरस्ती

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply