अलिबाग : प्रतिनिधी
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीची दाखल देऊन राज्य गुप्त वार्ता विभाग नियंत्रण कक्षातील सहा पोलीस अधिकारी व कर्मचार्यांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
एडीसी श्रीमती अलकनूर, प्रशांत लांगी, स. आ. इनामदार, आर. व्ही. शिंदे, विजय बनसोडे आणि रवींद्र साळवी या सहा जणांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. प्रशांत कणेरकर हे राज्य गुप्त वार्ता विभाग नियंत्रण कक्ष मुंबई येथे सेवेत रुजू असताना 2018मध्ये त्यांचे सहअधिकारी प्रशांत लांगी यांचे पाकीट चोरीला गेले. आपले पाकीट चोरीला गेल्याचा आरोप लांगी यांनी कणेरकर यांच्यावर केला होता. नुसता तोंडी आरोप न करता तशा आशयाची लेखी तक्रार त्यांनी एडीसी श्रीमती अलकनूर यांच्याकडे केली होती. लांगी यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे अलकनुर यांनी कणेरकर यांना मेमो दिला आणि लेखी उत्तर देण्यास सांगितले. त्यानंतर काढलेला मेमो कणेरकर यांना दिला नाही. अलकनूर, लांगी, इनामदार, शिंदे, बनसोडे आणि साळवी यांनी प्रशांत कणेरकर यांना या प्रकरणावरून टोमणे मारण्यास सुरुवात केली, तसेच वारंवार शेरेबाजी करून त्यांच्यावर चोरी केल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळेच माझ्या पतीने 16 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली, असे प्रशांत कणेरकर यांची पत्नी प्रतीक्षा कणेरकर यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार या अधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निरीक्षक के. डी. कोल्हे अधिक तपास करीत आहेत.