केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग 548अ हा ग्रीन हायवे बनविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्या रस्त्याबाबत अनेक त्रुटी असून त्या दूर करण्याची आवश्यकता आहे.
शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीबाबत अजूनही स्थानिक बाधित शेतकरी चिंतेत आहे. राष्ट्रीय महामार्ग 548अ हा कर्जत तालुक्यातून जात असून नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर शहापूर येथून सुरू होत आहे. शहापूरपासून कर्जत आणि पुढे जेएनपीटी बंदर असा हा प्रस्तावित महामार्ग 53 किलोमीटर लांबीचा असून सर्व रस्ता आरसीसी काँक्रीटचा होणार आहे. या रस्त्याचा कर्जत तालुक्यातील भाग 53 किलोमीटर लांबीचा आहे. प्रस्तावित10 मीटर रुंदीचा रस्ता आरसीसी काँक्रीटचा बनविला जाणार आहे. या राष्ट्रीय महामार्ग दर्जाच्या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यालगतची गावे, शेती, बाजारपेठ बाधित होणार आहे. शेती, त्यांची घरे बाधित होणार असल्याने भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता संजय गोसावी यांच्याकडे रस्त्याचे काम यांच्याकडे शेतकर्यांनी कळंब येथे बैठक घेऊन केली होती. 10 मीटरचे आरसीसी काँक्रीटचा रस्ता बनविला जाणार असून त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन मीटर लांबीची साईडपट्टी असणार आहे. त्याच वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक मीटर जागा ही झाडे लावण्यासाठी आरक्षित ठेवली जाणार असून त्यात झाडे उभी करून ग्रीन हायवे करण्याचा केंदीय मंत्री नितीन गडकरी यांचा मानस आहे.
शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली हाळ फाटा असा नवीन राष्ट्रीय महामार्ग बनविला जात आहे. आरसीसी काँक्रीटचा तो नवीन मार्ग असून उपलब्ध जागेनुसार रस्ता बनविला जात आहे. पूर्वी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणमधून हाळ फाटा ते कर्जत आणि पुढे कल्याण असा रस्ता दुपदरी करण्यात आला होता. त्यामुळे अपवाद वगळता या रस्त्याचे जुन्या रस्त्यावरच राष्ट्रीय महामार्ग म्हणून काँक्रीटीकरण सुरू आहे, मात्र या रस्त्याचे काम पाहणार्या राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एमएसआरडीसीने काम उरकण्यावर भर दिला आहे असे दिसून येत आहे. कारण त्या रस्त्यात येणार्या अडचणीदेखील एमएसआरडीसीकडून सोडवल्या जात नाहीत असे दिसून येत आहे. त्यामुळे रस्ता जरी नव्याने होत असला, तरी त्या रस्त्यामुळे पूर्वी असलेल्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जातच रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे. या दुपदरी रस्त्यावर कर्जतपासून पुढे खोपोलीकडे जात असताना अनेक ठिकाणी विजेचे खांब उभे आहेत. हे विजेचे खांब खोपोली येथून कर्जतसाठी जी मुख्य वीजवाहिनी येते त्या वीजवाहिनेचे खांब आहेत. त्यात अनेक खांब हे रस्त्याच्या मधोमध असून त्या खांबांवर रात्री प्रवास करणारे वाहनचालक धडकून पडू शकतात आणि मोठ्या अपघाताला त्या वाहनचालकांना सामोरे जावे लागू शकते. रस्त्याच्या मधोमध ते खांब असल्याने वाहनचालक यांना या रस्त्यावर उभे असलेले विजेचे खांब समजत नाहीत. हे लक्षात घेऊन रस्त्याचे काम करणार्या ठेकेदाराने त्या ठिकाणी रेडियमच्या पट्ट्या लावून माहिती देणे आवश्यक होते, त्याच वेळी अलीकडे माहिती फलक लावण्याची गरज होती, मात्र तशी कोणत्याही स्वरूपातील खबरदारी घेण्यात आली नाही. त्याच वेळी रस्त्यावर गेल्या वर्षापासून काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून रस्त्यात अडथळा ठरणारे विजेचे खांब हलविण्याचा प्रयत्न देखील रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून केला गेला नाही. त्यामुळे त्या विजेच्या खांबांना धडकून अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.
कर्जत-मुरबाड या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम राज्य रस्ते विकास महामंडळ करीत आहे. या रस्त्यावर आरसीसी काँक्रीटीकरण करताना राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून अनेक ठिकाणी 10 मीटर लांबीचे भाग बनविण्यात आले नाहीत, परिणामी त्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी प्रवास करणारे वाहनचालक हे जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. दरम्यान, या राष्ट्रीय महामार्गावर अर्धवट कामे तेहवली असतानादेखील त्याबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाला कोणतेही देणेघेणे नसल्याचे दिसून येत असून त्या त्या ठिकाणी रस्ता बंद आहे, असे फलक लावण्याचे सौजन्यदेखील रस्ते विकास महामंडळ दाखवताना दिसत नाही. कर्जत तालुक्यातून जाणार्या कर्जत- मुरबाड रस्त्याचा 52 किलोमीटर लांबीचा रस्ता कर्जत तालुक्यातून जातो. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग 548अ चा भाग असून या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून केले जात आहे.
रस्त्यावर अचानक येणारे खड्डे यामुळे वाहनांचे दररोज अपघात होत आहेत. हे 10 मीटर लांबीचे रस्ते वाहनचालक यांच्यासाठी मृत्यूचे सापळे समजले जात आहेत. रात्रीच्या वेळी कमी प्रकाश देणारे विजचे दिवे असलेल्या वाहनचालक यांना अपघातास कारणीभूत असलेले हे खड्डे रस्ते विकास महामंडळांने बनविले आहेत काय? असा प्रश्न वाहनचालक व्यक्त करीत आहेत.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून येणार्या वाहनांसाठी शहापूर तालुक्यातील वशेणी येथून मुरबाड-कर्जत-खोपोली वाकण असा राष्ट्रीय महामार्ग तयार होत आहे. ग्रीन हायवे म्हणून नियोजित असलेल्या महामार्ग रस्त्याचे बांधकाम महाराष्ट्र सरकारच्या राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले जात आहे. काँक्रिटच्या रस्त्याला भेगा पडणे, रस्त्यातील काँक्रिट बाहेर येणे, रस्त्याचा भाग खचून सपाट रस्त्यावर खोलगट भाग तयार होणे असे प्रकार घडले. काँक्रिटचा रस्ता बनला असला तरी या रस्त्याने वेगाने वाहने चालवणे धोक्याचे झाले आहे. रस्ता एकसंघ बनवला गेला नसल्याने रस्त्यावर 80 किमी वेगाने वाहने जात असताना समुद्रातील लाटाप्रमाणे वाहने वर-खाली होतात.
मुंबई-पुणे समृद्धी महामार्गासाठी कनेक्टिव्हीटीसाठी बनविण्यात आलेल्या शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामार्ग 548अ चे कर्जत तालुक्यातील आणि खालापूर तालुक्यातील काम अर्धवट आहे. कर्जत तालुक्यात मुरबाड तालुक्यात बाटलीचीवाडी येथे हा रस्ता प्रवेश करीत असतो तर डोलवली येथे हा रस्ता खालापूर तालुक्यात प्रवेश करतो. कर्जत तालुक्यातून साधारण 52 किमीचा रस्ता असून खालापूर तालुक्यात खोपोली येथे हा रस्ता पुढे पाली रस्त्याने वाकण येथे हा रस्ता पनवेल-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जाऊन मिळतो. कर्जत तालुक्यात कळंब येथे दोन ठिकाणी या रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्याच वेळी पुढे सुगवे गावाजवळ देखील चिल्लार नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूला हा रस्ता अर्धवट आहे. कर्जत तालुक्यातील नांगुर्ले गावाजवळ देखील हा रस्ता स्थानिकांनी बांधकाम करू न दिल्याने अर्धवट आहे. तर पळसदरीच्या वळणावर देखील रस्त्याचे काम झालेले नाही. तर पळसदरीपासून पुढे रस्त्याच्या एका लेनचे काम झाले नाही. तेथे स्थानिक वाहनचालक यांना अपघात होण्याची शक्यता असून मानकीवली गावाच्या पुढेदेखील हाळ फाट्यापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण झालेला नाही.
असे असताना देखील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून रस्त्यावर वाहनांसाठी टोल लावण्याची धडपड सुरू आहे.पळसदरी येथे एमएसआरडीसीकडून टोल नाका बनविण्याचे काम सुरू आहे, तसेच कर्जत तालुक्यातील भागूचीवाडी उताराजवळ देखील एमएसआरडीसीकडून टोलनाका उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. 35 किलोमीटर नंतर एक असे टोलनाके बनविले जात असतात, त्यामुळे शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामृगी रस्त्यावर टोलनाके बनविले जाणार आहेत, मात्र कर्जत तालुक्यातील या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे अंतर लक्षात घेता दोन टोलनाके बनवले जाणे हे कर्जत तालुक्याच्या वाहनांना आर्थिक भुर्दंड देणारे आहे. त्यात 52 किमीचा रस्ता कर्जत तालुक्यातून असताना या अंतरात दोन टोलनाके ही बाब चुकीची असून रस्त्याचे काम अर्धवट असताना दोन दोन टोलनाके ही कर्जत तालुक्यातील वाहनांवर अन्याय करणारी बाब आहे.
-संतोष पेरणे, खबरबात