खालापूर : प्रतिनिधी – तालुक्यात मगरींचा अधिवास नसतानाही भिलवले धरण परिसर व पाली बुद्रुक गावाजवळ मगरीची पिल्ले आढळली आहेत.
खालापूर तालुक्यात मागील आठ दिवसांत मगरीची किमान आठ पिल्ले सापडली असून, त्यातील दोन मृतावस्थेत आढळली आहेत. शनिवारी (दि. 13) आसरेवाडी आदिवासी वाडीतील मोकळ्या जागेत मगरीचे पिलू मृतावस्थेत आढळले होते. त्याला मारणार्याचा शोध सुरू असतानाच खालापूर वनक्षेत्र अधिकारी आशिष पाटील यांना मंगळवारी दुपारी पाली बुद्रुक गावाजवळील बिल्ले धरणाच्या उशाशी एका मोठ्या डबक्यात मगरीचे पिल्लू असल्याची खबर मिळाली. त्यांनी कर्जत वनाधिकारी नीलेश भुजबळ यांच्यासह त्या ठिकाणी धाव घेतली. प्राणिमित्र संघटनेचे अभिजीत घरत व त्यांच्या सहकार्यांच्या सहकार्याने तीन तास शोधमोहीम राबवून डबक्यातून तीन किलो वजनाचे मगरीचे पिलू हस्तगत केले व त्याला सुरक्षित ठिकाणी सोडले. बुधवारी (दि. 17) पुन्हा याच क्षेत्रात मगरीचे वास्तव्य असल्याचे जाणवल्याने कर्जत वनाधिकार्यांनी आपल्या पथकासह शोधकार्य हाती घेतले, मात्र त्याला यश आले नाही.
भिलवले धरण परिसरात अद्यापपर्यंत मगरीची किमान आठ पिले सापडली असून, त्यापैकी दोन मृतावस्थेत होती. आणखी काही पिले या परिसरात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ही मगरीची पिले आली कुठून, याबाबत वन अधिकारी व प्राणी मित्र संघटनेचे प्रतिनिधी चक्रावून गेले आहेत. अज्ञात व्यक्तीने ही पिले भिलवले परिसरात सोडली असावीत, असा संशय व्यक्त होत आहे.