Breaking News

विंडीजविरुद्ध रोहितकडे धुरा?

भारतीय युवा खेळाडूंना संधी मिळणार

मुंबई : प्रतिनिधी

विश्वचषकानंतर आता भारताचा संघ वेस्ट इंडिजबरोबर दोन हात करणार आहे. भारत आणि विंडीज यांच्यामध्ये दोन कसोटी सामने आणि प्रत्येकी तीन एकदिवसीय व ट्वेन्टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांसाठी संघ निवडताना युवा खेळाडूंना जास्त संधी देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

या मालिकांसाठी विराट कोहलीऐवजी रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व देण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे; कारण कोहलीने या सामन्यांमध्ये न खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण विश्वचषकानंतर आपण या सामन्यांमध्ये खेळण्यात तयार आहोत, असे कोहलीने सांगितल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी शुक्रवारी भारताच्या संघाची निवड करण्यात येणार होती, पण आता भारतीय संघाची निवड पुढे ढकलण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नुकतेच भारतात दाखल झाले. संघ निवडीपूर्वी या मालिकेमध्ये हे दोन खेळाडू खेळणार की त्यांना विश्रांती हवी आहे, हे निवड समितीला जाणून घ्यायचे आहे. त्याचबरोबर काही जणांच्या मते निवड समितीला धोनीबरोबर त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा करायची आहे. त्यामुळे निवड समितीने काही दिवसांनंतर निवड समितीची बैठक घेण्याचे ठरवले आहे.

निवड समितीची बैठक पुढे ढकलण्यामागे काही तांत्रिक गोष्टी असल्याचेही म्हटले जात आहे. बीसीसीआय, क्रिकेट प्रशासकीय समिती आणि अन्य काही पदाधिकार्‍यांनी काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामुळे निवड समितीची बैठक पुढे ढकलली असल्याचे म्हटले जात आहे.

ही बैठक आता शनिवारी किंवा रविवारी होऊ शकते. त्या वेळीही संघ जाहीर केला जाऊ शकतो, पण काही जणांच्या मते सोमवारी वेस्ट इंडिजविरुद्धचा भारतीय संघ जाहीर होईल.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply