अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबाग शहरातील एसटी बस स्थानकाजवळील रस्त्यावर दुतर्फा बसणार्या फेरीवाल्यांविरोधात अलिबाग नगरपरिषदेने शनिवारी (दि. 20) पोलीस बंदोबस्तात कारवाई केली गेली. त्यामुळे रस्ते आणि पदपथांनी मोकळा श्वास घेतला. अलिबाग शहरातील महावीर चौक ते आंबेडकर चौकदरम्यानचा मार्ग ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे, मात्र अनधिकृत फेरीवाले, हातगाडीवाले, फूलविक्रेते आणि भाजीविक्रेते यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या पदपथांचा ताबा घेतला होता. या सर्व अनधिकृत फेरीवाल्यांवर अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने शनिवारी धडक कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी महेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेचे कर्मचारी या कारवाईत मोठ्या संख्येने सहभागी झाले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला होता. वाहतूक पोलीस निरीक्षक सुरेश वर्हाडे आणि त्यांचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते. अनधिकृत फेरीवाल्यांचे साहित्य या वेळी जप्त करण्यात आले. एसटी बस स्थानकासमोरील पदपथही मोकळा करण्यात आला. दोन वर्षांत पहिल्यांदाच नगरपरिषद फेरीवाल्यांविरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरल्याचे या वेळी दिसून आले. अनधिकृत फेरीवाल्यांमुळे शहरातील रस्त्यांना बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. फेरीवाले आणि हातगाड्यांमुळे वाहतुकीसही अडथळा निर्माण होत होता. रस्त्याच्या कडेने चालण्यासाठी पादचार्यांना जागाच शिल्लक राहिली नव्हती. या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करा, अशी मागणी सातत्याने केली जात होती, मात्र कारवाई होत नव्हती. अखेर मुख्याधिकारी महेश चौधरी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाईत सहभाग घेतला.
अनधिकृत फेरीवाल्यांसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. वारंवार सूचना देऊनही फेरीवाले ना फेरीवाला क्षेत्रातून हटत नव्हते. त्यामुळे ही कारवाई सुरू करण्यात आली.
-महेश चौधरी, मुख्याधिकारी