मोहोपाडा : रामप्रहर वृत्त – श्री समर्थ सामाजिक संस्थेंतर्गत रसायनी परिसरातील एड्स आजाराचे वाढते प्रमाण नियंत्रणात राहावे या उद्देशाने एड्स समुपदेशन व आधार केंद्र गेली 10 वर्ष एचओसी गेस्ट हाऊस येथील कंपनीच्या बंगला न. सीटी 4 येथे सुरू आहे. रसायनीप्रमाणे कर्जत, खालापूर, पनवेल, उरण अशा चार तालुक्यांतील शेकडो एड्स रुग्णांमध्ये समुपदेशनद्वारे आनंदी जीवन जगण्याची उमेद निर्माण करून त्यांना औषधोपचार देण्याचे कार्य संस्था करत आहे. त्या रुग्णाची हेळसांड होऊन मृत्यू होऊ नये याकरिता रुग्णाला या सेंटरमध्ये आधार देण्याचे मोलाचे कार्य होत आहे. कंपनीकडून 2010 साली ही जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली होती, आतापर्यंतचे संपूर्ण भाडे भरण्यात आले आहे, कंपनीने सेंटर बंद करण्यासाठी कोणतीही लेखी नोटीस अद्याप दिलेली नाही. तरीही या जागी जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत हे केंद्र सुरू ठेवण्याबाबत अनेक वेळा विनंती अर्ज करण्यात आले असून केंद्र सरकारकडे देखील जागेसंबंधी पत्रव्यवहार सुरू आहेत.
शिवाय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, आमदार सुरेश लाड, महिला व बालकल्याण सभापती उमाताई मुंढे आदींचे शिफारस पत्र व परिसरातील जनतेने या जागतिक समस्या असलेल्या एड्स आजाराची जनजागृती सुरू राहावी व एड्स रुग्णाना आधार मिळावा याकरिता ग्रुप ग्रामपंचायत वासांबे मोहोपाडा येथे ग्रामसभा ठराव केलेला आहे. हे सर्व पत्रव्यवहार सीएमडी भिडे यांना देण्यात आले असताना देखील दिनांक 16/7/2019 रोजी कोणतीही नोटीस न देता 10 वर्ष सुरू असलेले हे एड्स समुपदेशन व आधार केंद्राला टाळे लावून संस्थेचा बोर्ड उखडून टाकला. या आधी काही संस्थांना शैक्षणिक व्यवसाय करण्याकरिता जागा देण्यात आली आहे, परंतु आम्ही संस्थेचे पदाधिकारी कोणतेही मानधन न घेता निःस्वार्थ हे कार्य करत आहोत. शिवाय आम्ही स्वतः प्रकल्पग्रस्त असूनदेखील आम्हाला समाजकार्य करण्यासाठी मात्र हे अधिकारी विरोध करत आहेत. हे केंद्र बंद झाल्याने या आजाराचे प्रमाण जनजागृती अभावी नियंत्रणात न राहता वाढेल व वाळीत पडणार्या रुग्णांचे खूप हाल होतील. त्यामुळे हे केंद्र सुरू राहणे ही काळाची गरज असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील यांनी बोलताना सांगितले.