अलिबाग : प्रतिनिधी
सुरांइतक्याच भावनाही महत्त्वाच्या असतात. तुमच्या गाण्यातून शब्दांतील भावना रसिकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. तरच त्या गाण्याला अर्थ असतो. केवळ आवाजात गोडवा आहे, सुरात गीत गायले म्हणजे गाणं होत नाही, असे परखड मत सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी व्यक्त केले. सुलोचनादीदी यांनी हिंदी, गुजराती, पंजाबी, तामिळ सिनेमात आपल्या सुमधुर आवाजाने अनेक गीते गायली आहेत, मात्र त्यांची खरी ओळख निर्माण झाली ती लावणीने. एकापेक्षा एक सरस लावण्या आपल्या ठसकेबाज आवाजात गाऊन महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेल्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण काही कामानिमित्त आपल्या कुटुंबीयांसमवतेत शनिवारी (दि. 20) अलिबागमध्ये आल्या होत्या. येथील तुषार या शासकीय विश्रामगृहात त्या काही काळ थांबल्या होत्या. त्या वेळी पत्रकारांनी त्यांची आवर्जून भेट घेतली. त्यांनी पत्रकारांशी उत्तम संवाद साधला. त्या वेळी कुठेही बडेजाव वा गर्व त्यांच्यात दिसला नाही. सुलोचना चव्हाण यांचे वय 86 वर्षे आहे. वयोमानापरत्वे थोडे ऐकावयास कमी येत असले तरी आजही त्यांच्या आवाजाची धार मात्र कायम आहे. चर्चेदरम्यान फर्माईश म्हणून त्यांनी ‘फड सांभाळ तुर्याला गं आला…’ ही लावणी म्हटली. या वयातही त्याच ठसक्यात त्या गात होत्या. आजकाल गाणे बदलले. संगीतही बदलले आहे. याबाबत बोलताना सुलोचना चव्हाण म्हणाल्या की, लावणीत फरक झालेला नाही. गायकीत फरक पडला आहे. सुरात गाण्याला महत्त्व दिलं जातंय, पण भावनांकडे दुर्लक्ष होतंय. गाताना शब्दांचा अर्थ आपल्या गळ्यातून आला पाहिजे. नुसतं सुरात गायलं म्हणजे गाणं होत नाही. त्यात भाव पाहिजेत. नाहीतर त्या गाण्यात काहीच अर्थ नाही. सुरात गायलेच पाहिजे. त्याचबरोबर आपल्या भावनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्या रसिकांपर्यंत पोहचवता आल्या पाहिजेत. आपण या जगात कायम राहण्यासाठी आलेलो नाहीत. कधी ना कधी जायचेच आहे. त्यामुळे हसत खेळत आनंदात जगा. शोक करीत बसू नका. हेच जगण्याचे सार आहे, असेही त्या म्हणाल्या.