उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचार्याला मारहाण

पनवेल/उरण ः बातमीदार -श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचार्याला मारहाण करणार्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनाच्या वतीने पनवेल तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचा़र्यानी मंगळवारी (दि. 22) एकदिवशीय कामबंद आंदोलन केले. तसेच याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी अक्षय कांबळे यांना दि. 20 जुलै रोजी रात्रपाळी करीत असताना रुग्णालयातील असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकानी शिवीगाळ व मारहाण केली. मुख्य आरोपींवर कारवाई न झाल्याने आज जिल्हाअध्यक्ष संदीप नागे यांच्या नेतृत्वाखाली निषेध म्हणून पनवेल तहसील कार्यालयातील सुमारे 60 अधिकारी व कर्मचाऱयांनी एकदिवशीय कामबंद आंदोलन केले. सरकारी कर्मचारी व डॉक्टर्स यांच्यावर होणार्या हल्लयाचा निषेध करून दोषी व्यक्तींवर तातडीने कारवाई करावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
तसेच उरण येथील राज्य सरकारी कर्मचार्यांनी उरणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना याबाबतचे निवेदन राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष डी. टी. केणी यांनी तालुक्यातील सरकारी कर्मचार्यांच्या उपस्थितीत गुन्हे पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांच्याकडे सादर केले आहे व आरोपीवर कारवाईची मागणी केली.