नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वेस्ट इंडिज दौर्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीमध्ये बदल होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात भगवी जर्सी घातली होती, पण आता या जर्सीमध्ये होणारा बदल हा रंगासंबंधी नसून नावासंबंधी असणार आहे.
भारतीय संघ सध्या परिधान करीत असलेल्या जर्सीवर ओप्पो असा शब्द लिहिलेला असतो आणि त्याच खाली इंडिया असा शब्द लिहिलेला असतो, मात्र या जर्सीवरील ‘ओप्पो’ या शब्दाची जागा ‘बायजू’ घेणार असल्याचे समजते. भारतीय संघाचा टायटल प्रायोजक असलेला ओप्पो हा विंडीज दौर्यापर्यंत संघाला प्रायोजकत्व पुरवणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात सुरू होणार्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपासून भारतीय संघाच्या जर्सीमध्ये ‘बायजू’ असे नमूद केले जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दौर्यात तीन ट्वेन्टी-20 आणि तीन कसोटी सामने खेळण्यात येणार आहेत. या दौर्यापासून टीम इंडियाच्या जर्सीमध्ये बदल दिसून येण्याची शक्यता आहे. मार्च 2017मध्ये ओप्पोने निविदा प्रक्रियेत भारतीय संघाच्या प्रयोजकत्वाचे हक्क 1079 कोटी या रकमेला पाच वर्षांच्या कालावधीसाठी खरेदी केले होते. त्या वेळी त्यांनी विवो कंपनीला मागे टाकले होते, मात्र एका वृत्तानुसार 2017मध्ये सांगितलेली रक्कम सध्या खूपच अधिक व बाजारात टिकून राहण्याच्या दृष्टीने धोकादायक आहे, असे कारण देत आता ‘ओप्पो’ने स्वतःहूनच प्रयोजकत्वातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.