उरण ः रामप्रहर वृत्त
शासनाच्या खोल समुद्रातील 60 दिवसांच्या पावसाळी मासेमारी बंदीच्या आदेशानंतर 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होणार आहे. फक्त 12 दिवसांचाच अवधी उरल्याने पर्सिसीयन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारातील सुरू होणार्या मासेमारीसाठी करंजा-मोरा-कसारा, ससूनडॉक बंदरात मच्छीमारांची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू झाली आहे. खोल समुद्रातील मासेमारी 50 ते 70 वाव खोलीपर्यंत केली आहे. परिसरात मासेमारी खोल समुद्रातील आणि पर्सियन फिशिंग या दोन प्रकारात मोठ्या प्रमाणात केली जाते. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच खवळलेला समुद्र शांत होतो. निरव शांत झालेल्या सागरात पर्सिसीयन नेट फिशिंगसाठी विशेषतः नारळी पौर्णिमेनंतर पोषक वातावरण असते. समुद्राच्या भूपृष्ठावरील 4 ते 5 किमी परिघातील परिसरात 35 ते 40 वाव खोलीपर्यंत पर्सिसीयन नेट फिशिंग केली जाते. गोल परिघातील सर्कलमध्ये शिशाच्या गोळ्या बांधलेली जाळी समुद्रात सोडली जाते. गोलाकार सर्कल सील केल्यानंतर समुद्राच्या भूपृष्ठावरील तरंगती विविध प्रकारातील मासळी अलगद जाळ्यात अडकली जाते. त्यानंतर यंत्राच्या साहाय्याने जाळी मच्छीमार बोटीत खेचली जातात. यामध्ये घोळ, काटबांगडे, मुशी, तकला, सूरमय, शिंगाला, तुणा, हलवा, तांब, पाखट यासारखी समुद्राच्या भूपृष्ठावरील तरंगती मासळी पकडली जाते. याआधी पर्सियन नेट फिशिंग 15 ते 20 वाव खोल समुद्रापर्यंत केली जात होती, मात्र समुद्र किनार्यावरील वाढत्या प्रदूषणामुळे 15 ते 20 वाव खोलीपर्यंत मासळी सध्या मिळेनाशी झाली आहे.