पनवेल : कामोठे सेक्टर 34 येथील एका कॉन्व्हेंट शाळेत नववीत शिकणार्या दोन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्राला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याला त्याच्याच घरात चोरी करण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. गेल्या दोन वर्षांत अशाप्रकारे या पीडित विद्यार्थ्यांने आपल्या घरातून दोन लाख 90 हजार रुपयांची रोख रक्कम व ऐवज चोरी केल्याचे समोर आले आहे. रोडपाली येथे राहणार्या एका वाहतूकदाराचा मुलगा कामोठेतील एका शाळेत नववी इयत्तेत शिकतो, त्याच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण
पनवेल : अशोक रिकबदास चोरडिया (वय 45 वर्षे) याचा ड्रेस मटेरियलचा धंदा आहे. त्यांची पत्नी वैशाली शांताराम पाटील असून अशोक चोरडिया यांचे, कापड बझार, गोडसे आळी या ठिकाणी वडिलोपार्जित भाडे तत्त्वावरील दुकान आहे. या दुकानाचे तीन भाग केलेले असून एक मोठा भाऊ चंद्रकांत यांच्या ताब्यात आहे, दुसरा अशोक यांच्या ताब्यात व तिसर्या भागात वैष्णवी सिलेक्शन नावाच्या दुकानात वैशाली ही टेलरिंग व ड्रेस मटेरियलचे दुकान चालवते. अशोक यांचे वैशालीसोबत लग्नापासून पटत नाही, त्यामुळे गेल्या तीन-चार वर्षापासून ते दोघे वेगळे राहत आहेत. वैशाली अशोक चोरडिया ही या ठिकाणी वकिलीचा व कपडे विकण्याचा व्यवसाय करते. दुकानाच्या मालकीबाबत त्यांच्यात वाद सुरू आहेत. 20 जुलै रोजी वैशालीने अशोक यांच्या डोळ्यात, चेहर्यावर लाल मिरची पावडर टाकली व त्यांना प्लायवूडच्या लाकडी दांडक्यांने मारहाण केली यात ते जखमी झाले आहेत.
कळंबोलीत दगडाने मारहाण
पनवेल : कळंबोली परिसरात हातगाडीवर फ्रुट व नारळपाणी विक्री करणार्या 27 वर्षीय व्यक्तीला दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आहे. याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाराजूल रूस्तमअली सरदार हा तरुण सेक्टर 6 कळंबोली येथे राहत असून तो हातगाडीवर नारळपाणी विक्रीचा व्यवसाय करतो. 21 जुलै रोजी चैतन्य व त्याचा मित्र मोटारसायकलवरून आले व हातगाडी बाजूला घेण्यास सांगून दाराजूल याला दमदाटी केली. त्याने हातगाडी बाजूला घेतल्यानंतर चैतन्यने त्याच्याकडे पैसे न देता नारळपाणी मागितले असता त्याला दाराजूलने नकार दिला. त्यानंतर चैतन्य व त्याच्या मित्रांनी हाताने मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली होती.