पनवेल : प्रतिनिधी
उमरोली येथील पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या आदित्य आणि सारिका आंब्रे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदतीचा धनादेश देण्यात आला आहे. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 25) पनवेल तहसील कार्यालयात हा चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. पनवेल तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 9 जुलै रोजी उमरोली येथील गाढी नदीपुलावरून पाणी वाहत होते. या वेळी आदित्य आणि सारिका आंबे्र हे पुलावरून पनवेलकडे येत होते, मात्र ते दोघे दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. शासनाकडून नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मयतांच्या वारसाना मदत करण्यात येते. गुरुवारी सारिकाची सासू आरती आंब्रे आणि सासरे हरिश्चंद्र आंब्रे यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते चार लाख रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला. या वेळी नायब तहसीलदार आदमाने आणि सूर्यवंशी उपस्थित होते.