Breaking News

सरकारचे चालले आहे काय?

राज्यातील कोरोना महामारीसंदर्भातील परिस्थितीत कोणताही सकारात्मक लक्षणीय बदल नाही. मात्र कोरोना चाचण्यांची संख्या कमी करुन परिस्थिती नियंत्रणात असल्याचे भासवणारे सरकार बिनदिक्कत हॉटेल्स व गेस्ट हाऊस उघडण्याचे पाऊल टाकत आहे. अंतर्गत फोडाफोडीच्या कलहाने पोखरलेल्या या सरकारला परिस्थितीचे भान आहे का?

राज्यात या आठवड्याची सुरुवात झाली ती सत्ताधारी महाविकास आघाडीतील नाराजी नाट्याने. राज्यातील सर्वसामान्य जनता कोरोना विषाणूचा वाढता फैलाव, त्यामुळे आजही बर्‍यापैकी ठप्प असलेले दैनंदिन व्यवहार, आर्थिक विवंचना आदींमुळे त्रस्त असताना राज्यातील तीन चाकी सरकार मात्र भलत्याच विषयांवरुन परस्परांमध्ये उद्भवलेले रुसवेफुगवे दूर करण्यात मशगुल असल्याचे सोमवारी दिसून आले. आठवड्याच्या या पहिल्याच दिवशी राज्यात पाच हजार 368 कोरोना बाधितांची नोंद झाली. तर याच दिवशी 204 कोरोनाग्रस्तांचे मृत्यूही नोंदले गेले. राज्यातील कोरोना विषाणूच्या फैलावाला अटकाव करण्यात कुठल्याही स्वरुपाचे यश या तिघाडी सरकारला मिळवता आलेले नाही. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या आजही भयावह रितीने वाढत असताना त्या विरोधात प्रभावी उपाययोजना करण्याच्या कामी सरकारची अवघी ताकद लावण्याऐवजी या तिघाडी सरकारमधील अंतर्गत कलहच सध्या टिपेला पोहचल्याचे दिसत आहे. आपल्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासाठी या आघाडीशी संबंधित नेतेमंडळी या ना त्या कारणाने भारतीय जनता पक्ष या विरोधी पक्षाकडे बोट दाखवत असतात. मुंबई महानगर प्रदेशातील कोरोनासंबंधित परिस्थिती अतिशय गंभीर आहे हे काही लपून राहिलेले नाही. ही परिस्थिती नियंत्रणात आणायची तर येथील चाचण्या वाढवण्याची आत्यंतिक गरज आहे. याकडे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले आहे. परंतु फडणवीस यांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांचे वर्णन आघाडी सरकारच्या नेत्यांकडून मात्र ‘सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न’ अशा स्वरुपात केले जात आहे. वास्तवत: ही सरकारचीच राज्यातील गंभीर कोरोना परिस्थितीपासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याची केविलवाणी धडपड म्हणावी लागेल. महाराष्ट्राच्या तुलनेत आता केरळमधील परिस्थिती पाहुया. कोरोनाच्या साथीला तसेच संबंधित मृत्यूदराला वेगाने आटोक्यात आणल्याबद्दल केरळ सरकारची कामगिरी देशभरात नावाजली गेली होती. त्यानंतर अलिकडच्या काळात केरळने कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा डोके वर काढताना देखील पाहिली. परंतु केरळ सरकारने पुन्हा हा फैलाव आटोक्यात आणला. तूर्तास केरळच्या राजधानीत तिरुवनंतपुरममध्ये कोरोना रुग्णांची संख्या काहीशी वेगाने वाढताना दिसत आहे असे लक्षात येताच केरळ सरकारने सोमवारपासून तेथे आठवडाभराचा कठोर लॉकडाऊन पुकारला आहे. हा लॉकडाऊन तिहेरी असून संबंधित जिल्ह्यातील सर्व लोकांच्या हालचाली नियंत्रित करण्यात आल्या आहेत. हॉटस्पॉटमधील लोकांना घरातच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर कोरोना रुग्णांच्या प्रथम व द्वितीय संपर्कातील लोकांनाही घरातच क्वारंटाइन राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा तिहेरी प्रभावी उपायांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणारे केरळ सरकार कुठे आणि चाचण्यांची संख्या कमी-जास्त करुन रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे भासवणारे महाराष्ट्रातील सरकार कुठे? यांच्या गोंधळयुक्त कारभारानेच देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून आता भारत जगभरातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त देशांमध्ये तिसर्‍या क्रमांकावर पोहचला आहे.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply