पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील 32 टक्के शेतकर्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात यश आल्याने रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुका दुसर्या स्थानावर असल्याची माहिती नायब तहसीलदार समीर देसाई यांनी दिली. येथील तहसील, तालुका कृषी आणि पंचायत समिती कार्यालयांच्या संयुक्त विद्यामाने रविवारी (दि. 24) पोलादपूरमधील बॅ. नाथ पै सभागृहामध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजनेबाबत ’मन की बात’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यूट्यूबवरून प्रसारित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ उपस्थितांना मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात नायब तहसीलदार देसाई बोलत होते. रानवडीतील गोविंद सुर्वे, कृष्णा उतेकर, कृष्णा मालुसरे, अनुसया नलावडे, केवनाळेतील मंगेश सोनवणे, सडवलीतील लक्ष्मण जाधव, बेबीबाई जाधव आणि अजित जाधव या शेतकर्यांचा पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे लाभार्थी म्हणून नायब तहसीलदार समीर देसाई यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते या वेळी सन्मान करण्यात आला. पोलादपूर पं.स.च्या सभापती दीपिका दरेकर, उपसभापती शैलेश सलागरे, नगराध्यक्ष निलेश सुतार, सभापती प्रसन्न बुटाला, गटनेता उमेश पवार, पं.स.सदस्य यशवंत कासार, तालुका कृषी विभागाचे के. पी. पाटील, मंगेश साळी रूपनंवर, दत्ता नरूटे, माने, महसूलचे अशोक सुसलादे, राठोड, श्रीनिवास खेडेकर व अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते.