नवी मुंबई : समाजातील सर्वांना अल्पशा शुल्कामध्ये संगीताचे शिक्षण मिळावे आणि अनुशासनप्रिय, निर्व्यसनी आणि निष्ठेने संगीतसाधना करणारे कलाकार आणि शिक्षक घडविणे हेच जीवितकार्य मानलेल्या पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वाशी येथील संकुलाचा विस्तार सोहळा विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या शुभहस्ते अलीकडेच पार पडला. यानिमित्त धारवाड येथील प्रख्यात गायक पद्मश्री पं. वेंकटेशकुमार यांचे शास्त्रीय गायन झाले. संस्थेचे सचिव पांडुरंग मुखडे यांनी त्यांना तबलासाथ, अविनाश दिघे यांनी हार्मोनियम साथ केली.
योग केंद्राचा गुरुपौर्णिमा उत्सव
पनवेल : इन्स्टिट्यूट ऑफ योग व आयुर्वेद आणि आरोग्य सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणार्या योग केंद्रातर्फे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम नुकताच येथील आरोग्य मंदिरात झाला. मंजिरी लिमये यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रमुख पाहुण्या फडके विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन यांचा परिचय करून दिला. त्यानंतर वैशंपायन यांच्या हस्ते गुरुपूजन करण्यात आले. योगशिक्षिका श्वेता शेलार हिने सर्वांचे आभार मानले.
पनवेलमध्ये ‘भक्तीरस’
पनवेल : आषाढी एकादशीनिमित्त पनवेल कल्चरल असोसिएशनने संस्थेच्याच सभागृहांत आयोजित केलेल्या ‘भक्तिरस’ या भक्तिसंगीताच्या मैफलीला भाविक श्रोते आणि रसिकांनी ‘हाऊस फुल्ल’ प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाची सुरुवात ओंकार प्रधान रूप गणेशाचे.. या आकांक्षा भोईर हिने सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. तिने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी… आणि जेथे जातो तेथे तू माझा… ही गाणीही सादर केली. निशांत सुतारने ‘नामाचा गजर गर्जे भीमातीर…, पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा… आणि विठ्ठल आवडी प्रेमभाव हे अभंग सुरेलपणे सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. त्याचबरोबर स्वाती कुलकर्णी, अर्चना ताम्हनकर, जयंत टिळक, रेणुका दलाल, मिलिंद गोखले, चंद्रकांत मने, सुमुख साठे यांनी सुरेल रचना सादर केल्या. या मैफलीत खरे रंग भरले ते संध्या घाडगेने. तिने माझे माहेर पंढरी… आणि बोलावा विठ्ठल… हे दोन अभंग प्रचलित, रूढ चालीत न म्हणता किशोरीताईंनी दिलेल्या चालीत म्हटले, तसेच पद्मनाभा नारायणा.., हा अभंगही तयारीने सादर केला. अवघा रंग एक झाला.. या भैरवीने तिने या अडीच तास चाललेल्या मैफलीची सांगता केली. जयंत टिळक यांची संकल्पना आणि संयोजन असलेल्या या मैफलीला सुयोग्य अशी साथसंगत नंदकुमार कर्वे आणि संध्या घाडगे (हार्मोनियम), गणेश घाणेकर (तबला), धनंजय खुटले (पखवाज) आणि सतीश बेलापूरकर (तालवाद्ये) यांनी केली. निवेदक महेश गाडगीळ यांनी या अभंगवाणीचे सूत्रसंचालन उत्कृष्टपणे केले.