Breaking News

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू

मोहपाडा ः रामप्रहर वृत्त

रसायनीतील मोहोपाडा शिवनगर येथील पत्रकार राकेश खराडे यांचा मुलगा सार्थक (वय 6 वर्षे साडेतीन महिने) याला रविवारी 7 नंतर अचानक ताप येऊन उलटीचा त्रास झाला. या वेळी सार्थकला आई-वडिलांनी जवळपासच्या एका हॉस्पिटलातील डॉक्टरला दाखवून अ‍ॅडमिट केले. डॉक्टरने सार्थकला सलाईन लावली, परंतु सलाईन चालू असताना सार्थकला आकडी आल्याने डॉक्टरने पुढील उपचारासाठी नवीन पनवेल येथील एका हॉस्पिटलात नेण्याचा सल्ला दिला. या वेळी सार्थकच्या नातेवाईकांनी क्षणाचाही विलंब न करता सार्थकला नवीन पनवेल येथील एका खाजगी हॉस्पिटलात रविवारी रात्री 1 वाजता उपचारार्थ दाखल केले, परंतु योग्य उपचार न झाल्याने व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले.

हॉस्पिटलातील डॉक्टरांनी सार्थकच्या जीवाशी खेळ केला असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे सार्थकला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून अशा डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास इतर बालकांवरही अशी परिस्थिती ओढवू शकते, असे सार्थकच्या नातेवाईकांनी सांगितले. सार्थक खराडे याचे निधन झाल्याचे समजताच शिवनगर येथे मोठी गर्दी जमली. त्याच्यावर सेबीजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी सार्थक शिक्षण घेत असलेल्या प्रिआ शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका, सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार व नातेवाईक मित्रमंडळी उपस्थित होते.

सार्थकला उलटीचा त्रास झाल्याने त्याला नवीन पनवेल येथील हॉस्पिटलात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या वेळी डॉक्टरांना आजाराचे निदान न झाल्याने त्याची प्रकृती गंभीर होत गेली.हॉस्पिटलातील डॉक्टरांनी 15 तासांनंतर एमआरआय केल्याने आजारपण सापडले, पण वेळ निघून गेली होती. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझा मुलगा दगावला.

-राकेश खराडे, वडील

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply