जलसंवर्धनासाठी पूरक असलेली आपली पारंपरिक शेती काळाच्या ओघात नष्ट होत असल्यामुळे आता आपल्या सर्वांवर प्रत्यक्ष पाण्याचीच शेती करण्याची वेळ आली आहे. ’पेरलत तरच उगवेल’ हा पारंपरिक शेतीचा मंत्रच या पाण्याच्या शेतीलादेखील लागू होतो. पाण्याची शेती, जी करण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही, ती करणे सर्वसामान्यांसाठी सोपे कसे होईल, हे संगण्यासाठीच पागोळी
वाचवा अभियान.
आम्ही लोकांपुढे ठेवलेल्या पागोळी वाचवा अभियानाला लोकांनी खूप सकारात्मक आणि कृतिशील प्रतिसाद दिला. दरम्यान, लोकांच्या मनातल्या काही शंकादेखील समोर आल्या, ज्यांचे समाधान होणे आवश्यक आहे.
हा विषय लोकांपुढे ठेवताना आम्हालाही पूर्ण कल्पना होती की आम्ही लोकांना नवीन असे काहीही सांगत नाही आहोत. तरीही लोकांना ती संकल्पना आवडली आणि लोकांनी तिला चांगला प्रतिसाद दिला. याचे आमच्या दृष्टीने एकमेव कारण म्हणजे लोकांच्या मनातील जलसंवर्धनाची तळमळ पूर्ण करण्याचे साधन पागोळीच्या साध्यासुध्या आणि अत्यंत सोप्या स्वरूपात त्यांच्यासमोर आले. पाण्याविषयीची त्यांची संवेदना व्यक्त करण्याचे साधन त्यांच्या ओंजळीतच आहे याची जाणीव त्यांना या अभियानाने करून दिली.
आजच्या घडीला पाण्याचे दुर्भिक्ष, त्याचे संवर्धन आणि त्यासाठीची जमीन, विहीर पुनर्भरण, खंदक, बंधारे इत्यादींसारखी साधने यांचा विचार करत नसेल, अशी क्वचितच कोणी व्यक्ती असेल. त्याचाच परिणाम म्हणून
जलसंवर्धनाचे अनेक पर्याय सातत्याने लोकांच्या समोर येत राहतात. प्रत्येक जण आपापल्या परीने त्याच्यावरचा उपाय सांगण्याचा प्रयत्न करतो. ते सर्व उपाय सुचवण्यामागचे उद्देश निश्चितपणे अत्यंत प्रामाणिक असतात यामध्ये शंका घ्यायचे काहीच कारण नाही, परंतु समोर येणार्या अशा नानाविध पर्यायांमुळेच जे लोक जलसंवर्धनासाठी काही करू इच्छितात त्यांच्या मनाचा गोंधळ उडत आहे, हे या पागोळी वाचवा अभियानाच्या निमित्ताने लक्षात आले. जलसंवर्धनासाठी समोर येणारे सर्वच उपाय हे त्यांच्या परीने प्रामाणिक असले तरी ते अमलात आणताना थोडे तारतम्य ठेवण्याची गरज आहे हेदेखील लक्षात आले. विचार करता उपलब्ध सर्व उपायांचे मोजमाप करून काही निकष निश्चित करून सर्वसामान्यांना सहजपणे अमलात आणता येईल असा एक सर्वंकष आणि प्रभावी उपाय लोकांपुढे ठेवावा असे वाटले. या विचाराने पुढीलप्रमाणे त्याचे काही निकष ठरविण्यात आले. आपल्या घराच्या छपरावर पडणारे पावसाचे पाणी पन्हळीद्वारे किंवा पीव्हीसी पाइपद्वारे एकत्र करून आपल्या घराच्या आवारामध्ये खणलेल्या 1 मीटर लांबी, 1 मीटर रुंदी, 1 मीटर खोलीच्या खड्ड्यामध्ये जिरण्यासाठी पाइप किंवा इतर कोणत्याही उपलब्ध साधनाने नेऊन सोडणे. बस्स, एवढंच! आकाशातून पडणारे पाणी जमिनीवर पडून वाहू न देता ते जागच्या जागी जमिनीत जिरवणे आणि जमिनीखाली असलेले आणि आता रिकामे झालेले पाण्याचे साठे पुन्हा समृद्ध करणे.
अभियानांतर्गत त्याचे एक मॉडेल तयार केले आहे, जे फेसबुक, व्हॉट्सअॅप इत्यादी समाजमाध्यमांवर पाहिले जात आहे आणि त्याबाबत आमच्याकडे मोठ्या प्रमाणात विचारणा होत आहे. यापुढे या उपायाचा उल्लेख आपण ’मॉडेल’ म्हणूनच करू या. अशा प्रकारचे मॉडेल तुम्ही तुमच्या आवारामध्ये घराजवळ अगदी सहजपणे उभे करू शकता.
या मॉडेलचे फक्त तीन टप्पे आहेत. पहिला म्हणजे छपरावरचे पाणी पन्हळीद्वारे एकत्र करणे, दुसरा म्हणजे ते पाइपने खड्ड्यापर्यंत वाहून नेणे आणि तिसरा म्हणजे ते पाणी जिरवण्यासाठी खड्डा तयार करणे. आवारामध्ये जर वापरातील विहीर किंवा कूपनलिका असेल तर तिच्यापासून दोन ते तीन फूट अंतरावर खड्डा खणावा, जेणेकरून खड्ड्यामध्ये जिरणार्या पाण्याचा थेट फायदा त्या विहीर किंवा कूपनलिकेतील पाण्याची उपलब्धता जास्त काळ टिकण्यासाठी होऊ शकतो. अन्य परिस्थितीमध्ये हा खड्डा घराच्या इमारतीपासून आठ ते दहा फूट दूर आणि इतर कोणत्याही बांधकामापासून (कंपाऊंड भिंत, पंपशेड वगैरे) किमान दोन ते तीन फूट दूर आवारामध्ये आपापल्या सोयीप्रमाणे कोठेही करावा.
एक मीटर लांबी, रुंदी, खोलीचा खड्डा खणून झाल्यावर त्याचा तळ आणि चारही बाजू मोकळ्या ठेवून जमिनीच्या वर चारही बाजूंनी केवळ सहा इंच उंचीचे वीटबांधकाम करून घ्यावे. ते शक्य नसेल तर आजूबाजूचे दगड-धोंडे खड्ड्याच्या चारही कडांवर ठेवून खड्ड्यातून काढलेली माती त्यावर सर्व बाजूंनी दाबून बसवावी आणि साधारण आठ ते दहा इंच उंचीचा उंचवटा तयार करावा. त्यामुळे अतिवृष्टीच्या वेळी खड्ड्यातील पाणी जमिनीच्या पातळीपर्यंत आले तरी ते त्यापेक्षा वर येऊन इतरत्र पसरणार नाही. उलट वरून पडणार्या अतिरिक्त पाण्याचा दबाव खड्ड्यामध्ये तयार होऊन पाणी जमिनीत जिरण्याचा वेग वाढेल. सततच्या मोठ्या पावसातदेखील व्यवस्थित बंदिस्त केलेल्या खड्ड्यातील पाणी जमिनीच्या पातळीवरच खेळत राहते. जमिनीच्या वर ते येत नाही असे निरीक्षण आहे.
खड्डा पूर्णपणे मोकळा ठेवावा. त्यामध्ये दगड, धोंडे, खडी, वाळू इत्यादींसारखे काहीही टाकण्याची आवश्यकता नाही. खड्ड्याची क्षमता कमी होईल असे काहीही करू नये. काही वेळा खड्ड्यामध्ये प्लास्टिकचे भोक पाडलेले पिंप उभे केलेले दाखवतात. तसे केल्याने खड्ड्याची पाणी जिरवण्याची क्षमता आपणच कमी करतो. पावसाचे प्रमाण कमी असेल त्या भागात खड्ड्याचा आकार यापेक्षाही कमी घेऊन चालेल, परंतु अनावश्यक गोष्टींचा वापर करून आपले श्रम आणि खर्च वाढवू नये. जमीन स्वतःच एक उत्तम फिल्टर आहे.
खड्ड्यामध्ये जमिनीपासून किमान एक फूट उंचीवरून पाणी पडायला हवे. त्यापेक्षा जास्त उंचीवरून पडले तर ते दिसेलही चांगले आणि पाहताना तुमच्या मनाला आनंदही होईल.
सुरक्षेच्या दृष्टीने तो खड्डा तिथे उपलब्ध असलेल्या लाकूड, झाप, जुना लोखंडी, सिमेंटचा पत्रा इत्यादींनी झाकायचा की नाही हे तुम्ही ठरवू शकता. याच पद्धतीने पागोळीचे पाणी थेट कूपनलिकेमध्ये किंवा विहिरीमध्ये सोडणे याचे थोडे जास्तच आकर्षण लोकांच्या मनामध्ये आहे असे लक्षात आले आहे. साडेतीन फूट खोलीच्या खड्ड्यामध्ये पाणी सोडण्याऐवजी ते जर थेट विहिरीमध्ये सोडले तर साधारणपणे तीस ते पन्नास फूट आणि कूपनलिकेमध्ये सोडले तर थेट दोनशे ते तीनशे-चारशे फूट खाली जाऊन अधिक प्रभावीपणे जमिनीमध्ये जिरेल असे लोकांना वाटणे हे तार्किकदृष्ट्या बरोबरदेखील आहे, परंतु काही निकषांवर हे दोन्ही पर्याय अभियानांतर्गत सुचवलेल्या मॉडेलच्या मागे पडतात. त्यातील सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे पर्याय आरोग्यदायी असण्याचा. पिंपाला दुपदरी-चौपदरी साडी गुंडाळून किंवा तेच पिंप भोके पाडून खड्ड्यात उभे करून भोवताली दगड, धोंडे, खडी, वाळू इत्यादींचा वापर करून जे एक प्रकारचे ’गाळणे’ तयार होते, त्यामध्ये पाण्यातला फक्त दृश्य कचराच विहिरीमध्ये किंवा कूपनलिकेमध्ये जाण्यापासून रोखला जातो.
जलसंवर्धनाचे इतरही अनेक मार्ग उपलब्ध आहेत, परंतु सर्वसामान्य माणसाला
स्वतःच्या भवितव्यासाठी जलसंवर्धनाचा सहज, सोपा आणि तत्काळ अमलात आणता येईल असा स्वावलंबी मार्ग प्रात्यक्षिकासह सुचवणे हा पागोळी वाचवा अभियानाचा मुख्य उद्देश असल्याने त्याची चर्चा येथे अनावश्यक ठरेल.
शेवटी जलसंवर्धनाच्या पालखीचे भोई तुम्हा- आम्हालाच व्हायचे आहे आणि त्यासाठी खणल्या जाणार्या खड्ड्यांमध्येच आपल्या पुढच्या पिढ्यांचे भवितव्य सामावले आहे याचे भान न हरवू देण्याचे आवाहन करून आतापुरते थांबू या. -सुनील प्रसादे, दापोली