पनवेल : प्रतिनिधी
कळंबोली येथे महामार्गावर शुक्रवारी (दि. 27) सकाळी मॅकडोनोल्डसमोर सातारा जिल्ह्यात आपल्या गावाला जाण्यासाठी दुधाच्या टेम्पोतून बेकायदेशीरपणे प्रवास करीत असलेले 20 ते 25 जण आढळून आल्याने त्यांच्यासह चालकावर नवी मुंबई पोलीस आयुक्तांसमोर कारवाई करण्यात आली. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे रेल्वे बंद ठेवण्यात आली आहे. एसटी, खाजगी बसेस आणि खाजगी वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात नोकरी धंद्यानिमित्त आलेल्यांना आपल्या गावाला जाता येत नाही. सरकारने नागरिकांना आपण ज्या ठिकाणी आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी घराबाहेर पडू नका, असे सांगण्यात येत आहे. पण अनेक नागरिक कोरोनाला घाबरून आपल्या गावाला जाण्यास निघाले आहेत. त्यांना गावाला जाण्यासाठी वाहतुकीची सोय नसल्याने पश्चिम महाराष्ट्रातून दूध घेऊन येणार्या वाहनांना अत्यावश्यक सेवा म्हणून सूट देण्यात आल्याचा फायदा घेऊन काही वाहनचालक संधीचा फायदा घेऊन पैसे कमावण्यासाठी त्यामधून प्रवाशी वाहतूक करीत असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी सकाळी कळंबोली येथे महामार्गावर मॅकडोनोल्डसमोर एमएच 43 बिजी 6736 या दुधाची वाहतूक करणार्या टेम्पोत पाठीमागे शटर बंद करून 20-25 प्रवाशी भरून टेम्पो फलटण येथे निघाला असताना कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड, वाहतूक शाखेचे अंकुश खेडेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी त्याला अडवून झडती घेतली असता आतमध्ये दाटीवाटीने बसलेले प्रवाशी दिसून आले. त्यांना खाली उतरवून चालकावर कारवाई करण्यात आली. या वेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार त्याठिकाणी भेट देण्यासाठी आलेले होते.