पाली : प्रतिनिधी
येथील रामआळीजवळ ब्रिटिशकालीन दगडी इमारतीमध्ये पोलीस ठाणे आणि न्यायालय होते. मुसळधार पावसामुळे या इमारतीची भिंत कोसळली. त्यामुळे येथून जाणार्या येणार्यांसाठी धोका निर्माण झाला आहे.
या ब्रिटिशकालीन चिरेबंदी वास्तूत पोलीस ठाणे आणि न्यायालयासह तहसील व उपलेखा कार्यालय देखील होते. ही सर्व कार्यालये नवीन इमारतीत हालविण्यात आली आहेत. त्यामुळे ही पुरातन इमारत वापरात नव्हती. मुसळधार पावसामुळे या इमारतीची रस्त्याच्या बाजूला असलेली भिंत ढासळली आहे. बाजूला रहदारीचा रस्ता असल्याने येथून जाणार्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाचे या इमारतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.
ऐतिहासिक वास्तू दुर्लक्षित
पालीतील या वास्तूतील कार्यालयाचा कारभार पाहण्याची जबाबदारी ब्रिटिशांनी भोरचे संस्थानिक पंतसचिव यांच्याकडे दिली होती, असे इतिहास अभ्यासक सुरेश पोतदार यांनी सांगितले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून 2003 पर्यंत येथे कोर्ट आणि पोलीस ठाणे सुरू होते. त्यावेळी या वास्तूची योग्य देखभाल आणि देखरेख होत होती.
ही पुरातन वास्तू आहे. योग्य देखभाल करून तिला जपले पाहिजे. मात्र ही वास्तू ग्रामपंचयातीच्या अखत्यारित येत नाही. ही वास्तू ग्रामपंचायतीकडे वर्ग केल्यास तिचा सदुपयोग करता येईल.
-गणेश बाळके, सरपंच, पाली, ता. सुधागड