Breaking News

पालीत संकष्ट चतुर्थीला फुलला भक्तीचा मळा

ट्रस्टचे चांगले नियोजन, व्यवसायिकांचा धंदा तेजीत

पाली : प्रतिनिधी

आयएसओ मानांकन प्राप्त व अष्टविनायकांपैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी शुक्रवारी (दि. 21) संकष्टी चतुर्थीला पालीत भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. कोविडच्या तिसर्‍या लाटेत देखील कोरोना नियमांचे पालन करीत भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शन घेताना दिसून आले.

दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या उत्तम सोयीसुविधेसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट व प्रशासन नेहमीच दक्ष व सज्ज असते. मंदिर दर्शनासाठी खुले असल्याने भक्तांना बल्लाळेश्वराच्या दर्शनाची आगळीवेगळी ओढ दिसून येते. मागील दोन महिन्यांपासून दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. अशा वेळी भाविक भक्तगणांची कोणतीही गैरसोय होऊ नये, त्यांना शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत दर्शन घेता यावे यासाठी देवस्थान, तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेत उपाययोजना करण्यात आली होती.

गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यवसायिकांचा धंदादेखील तेजीत होता. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक महिला विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा चांगला झाला. भाविकांसह व्यावसायिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच अ‍ॅड. धनजंय धारप, जितेंद्र गद्रे, माधव साने, विनय मराठे, उपेंद्र कानडे, सचिन साठे, राहुल मराठे आदींसह अन्य पदाधिकार्‍यांनी पाली बल्लाळेश्वर देवस्थानात येणार्‍या भाविक भक्तगणांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवासुविधा मिळाव्यात यादृष्टीने सुनियोजन केले आहे. त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.

दीड-दोन वर्षानंतर मंदिर सुरू झाल्याने बाप्पाच्या  दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. खूप दिवसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक पाहायला मिळाले.पर्यटकदेखील मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यामुळे व्यवसायदेखील चांगला झाला. लहानमोठ्या व्यावसायिकांना रोजगार निर्माण झाला.

-चंद्रसेन भालेराव, व्यावसायीक, बल्लाळेश्वर मंदिर परिसर

कोविडनंतर बल्लाळेश्वर मंदिर व परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टने रायगड  जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोना काळात विशेष खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.

-अ‍ॅड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply