मुंबई : प्रतिनिधी – उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक मंगळवारी (दि. 30) मुंबईत पुनश्च भाजपत सक्रिय झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाईक यांचे स्वागत करताना त्यांच्या मार्गदर्शनाचा व अनुभवाचा पक्षाला लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, प्रदेश सचिव संजय उपाध्याय, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख व प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते अवधूत वाघ, मुंबई भाजप सरचिटणीस अमरजीत मिश्रा आणि उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार उपस्थित होते.
या वेळी राम नाईक म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदाची माझी मुदत काल संपली. त्यानंतर आज भाजपचे सदस्यत्व स्वीकारत आहे. राज्यपालपद स्वीकारण्यापूर्वी मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सुपूर्द केला होता. आता पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्वीपेक्षा अधिक गतीने पार पाडू. नाईक यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.