पनवेल ः रामप्रहर वृत्त – आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नगरसेविका नीता माळी यांच्यामुळे सोमवारी (दि. 29) सकाळी चार दिवसाच्या बाळाला जीवदान मिळाले.
नगरसेविका नीता माळी या सर्व सामान्य माणसाच्या मदतीसाठी सतत झटत असतात. पुराचे पाणी घरात आले की त्यांना प्रत्यक्ष जाऊन मदत करणे, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना सहकार्य करणे असे अनेक सामाजिक कार्य या सतत करत असतात. सोमवारी चार दिवसांच्या बाळाला कोणी तरी माथाडी कॉलनी उसर्ली येथे भर पावसात सोडून गेले होते. बाळाच्या रडण्याने येथील एका महिलेने त्या बाळाला आपल्या घरात घेतले व नीता माळी यांना संपर्क केला. नीता माळी क्षणाचाही विलंब न लावता तिथे पोहचल्या, बाळालासोबत आपल्या घरी घेऊन गेल्या. त्याला स्वच्छ केले. गरम उबदार कपड्यांमध्ये गुंडाळले, दूध पाजले आणि बाळाला घेऊन शहर पोलीस ठाणे गाठले. सर्व माहिती पोलिसांना दिली. सकाळपासून रात्रीपर्यंत त्या बाळासोबत होत्या. आईप्रमाणे त्यांनी त्या बाळाची काळजी घेतली. त्यांनी बाळाला पुढील सुखरूप ठिकाणी पाठवण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. पनवेल शहर पोलिस ठाण्याचे श्री. राजपूत यांनी मोलाचे सहकार्य केले.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी यांना ही माहिती मिळाली तेव्हा त्यांनीही आपल्या टीम सोबत पोलीस ठाणे गाठले व बाळाची विचारपूस करून माहिती घेतली. त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी, यांच्यासोबत राष्ट्रीय कार्याध्यक्ष अल्ताफ सैय्यद, शब्बीर कोठारी, गझनफर नावडेकर,फिरोज सय्यद,निलेश राठोड, इम्रान शेख आदी पदाधिकारी होते. त्यानंतर नीता माळी व पोलीस कर्मचारी त्या बाळाला मेडिकलसाठी पनवेल रुग्णालयात घेऊन गेले आणि त्यानंतर बाळाला अलिबाग बालाश्रम येथे पाठविण्यात आले.