महाजनादेश यात्रेला अमरावतीतून सुरुवात
अमरावती ः प्रतिनिधी
अमरावतीमधील गुरुकुंज मोझरी येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला गुरुवारी (दि. 1) सुरुवात झाली असून, या वेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या सरकारने 15 वर्षांत केले नाही त्यापेक्षा दुप्पट आम्ही करून दाखवले, असा दावा या वेळी मुख्यमंत्र्यांनी केला. पुन्हा भाजपचे सरकार येणार असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या वेळी उपस्थित होते. भाजपमध्ये जागा फुल्ल झाल्या असून, आता भरती नाही, असे सांगताना जे चांगले आहेत त्यांना भाजपत घेतोय. जे लायक नाहीत त्यांच्यासाठी हाऊसफुल्लचा बोर्ड लागलाय, असे त्यांनी सांगितले.
जनताच आमची राजा आहे. जनता आमचे दैवत आहे. आम्ही मालक नाही, सेवक आहोत, असे या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले, तसेच आपण केलेली कामे जनतेकडे जाऊन सांगायची आहेत. महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी चाललो आहे. आपण केलेल्या कामांची माहिती देणार आहोत आणि पुन्हा एकदा जनादेश घेऊन येणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पाच वर्षांत सर्व समस्या आम्ही संपवल्या, असा दावा करणार नाही, पण गेल्या सरकारने 15 वर्षांत केले नाही त्यापेक्षा दुप्पट आम्ही करून दाखवले, असे सांगत कोणत्याही व्यासपीठावर येऊन चर्चा करायला आपण तयार आहोत, असे खुले आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिले.