पनवेल ः बातमीदार – पनवेलमध्ये राहणार्या गीतांजली मधुकर भालेराव या 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू हा डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी आशीष भगत आणि विजय भगत या दोघा बीएएमएस डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. सप्टेंबर 2013मध्ये गीतांजलीचा मृत्यू झाला होता.
नवीन पनवेल येथे राहणारी गीतांजली आजारी असल्याने पालकांनी तिला त्याच भागातील डॉ. आशीष भगत या डॉक्टरकडे नेले. त्या वेळी डॉ. आशीष याने गीतांजलीला तपासून मलेरियाची लक्षणे दिसत असल्याचे सांगून तिला रक्त तपासण्याचा सल्ला दिला होता. रक्त तपासणीत गीतांजलीला मलेरिया झाल्याचे निदान झाल्यानंतर डॉ. आशीषने तिला औषधे दिली, मात्र त्यानंतरही गीतांजलीच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर भालेराव कुटुंबीयांनी तिला डॉ. विजय भगतकडे नेले. या वेळी गीतांजलीला उलटी-जुलाब होत असल्याने डॉ. विजय याने तिची तपासणी करून तिला इंजेक्शन व गोळ्या दिल्या, मात्र त्यानंतरही तिच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे गीतांजलीला पुन्हा डॉ. विजयकडे नेण्यात आले. या वेळी डॉ. विजय याने गीतांजलीची तपासणी केली असता, तिची प्रकृती जास्त बिघडल्याने तिला तत्काळ मोठ्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार गीतांजलीच्या पालकांनी प्रथम एमजीएम रुग्णालयामध्ये नेले, मात्र तेथे अतिदक्षता विभागात जागा नसल्याने गीतांजलीला पनवेलमधील पॅरामाऊंट रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तिथे गीतांजलीचा 8 सप्टेंबर 2013 रोजी मृत्यू झाला. तिचे वडील मधुकर भालेराव यांनी गीतांजलीचा मृत्यू हा आशीष भगत आणि विजय भगत या दोघांच्या निष्काळजीमुळे झाल्याची तक्रार पनवेल शहर पोलिसांकडे केली होती.
रायगड जिल्हा शल्य चिकित्सकांनी गीतांजलीच्या मृत्यू प्रकरणाचा सखोल तपास केला असता आशीष भगत आणि विजय भगत हे दोघेही बीएएमएस डॉक्टर असताना व त्यांना फक्त आयुर्वेदिक औषधोपचार करण्याची मुभा असताना, त्यांनी गीतांजलीवर अॅलोपथी पद्धतीने उपचार केले. त्यामुळे गीतांजलीची तब्येत जास्त बिघडून तिचा मृत्यू झाल्याचा अहवाल दिला. या अहवालावरून पोलिसांनी आशीष भगत आणि विजय भगत या दोघांवर निष्काळजीचा गुन्हा दाखल करून दोघांना गुरुवारी अटक केली. न्यायालयाने दोघांची जामिनावर मुक्तता केली आहे.