Breaking News

खैराटवाडीजवळ रस्ता ओलांडण्याची अखेर सोय ; ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश

पनवेल ः बातमीदार  – मुंबई-गोवा महामार्ग ओलांडता यावा, यासाठी काही दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यातील खैराटवाडी ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करीत गुरुवार (दि. 1) पासून महामार्गावरचे दुभाजक तोडून रस्ता ओलांडण्याची सुविधा देण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या गावांना महामार्ग रुंदीकरणाचा त्रास जाणवू लागला आहे. गावांजवळ रस्ता ओलांडण्याची सुविधा नसल्यामुळे पनवेल तालुक्यातील खैराटवाडी ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे रुंदीकरण झाल्यापासून पाठपुरावा सुरू केला होता. दररोज गैरसोय होणार्‍या शेकडो नागरिकांसाठी येथे दुभाजक व्हावे, अशी ग्रामस्थांची इच्छा होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत फेगडे, यांना निवेदने देऊनही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे  रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. पनवेल शहरात पायी मोर्चा काढून प्रांतअधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन कायदेशीर मार्गाने रस्ता ओलांडण्याची व्यवस्था होऊ शकत नसेल, तर हॉटेल चालकांच्या सोयीसाठी रस्ता ओलांडण्याची सुविधा देणार्‍या प्राधिकरणाविरोधात कार्यालय बंद करून टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत फेगडे यांनी त्यांना स्वतः फोन करून खैराटवाडी गावाजवळ रस्ता ओलांडण्याची सुविधा देत असल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे गुरुवारी सकाळपासूनच या कामाची सुरुवात झाल्यामुळे स्थानिकांच्या आंदोलनाला यश आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply