सबंधितांवर कारवाईची तेजस कांडपिळे यांची मागणी
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल रेल्वेस्थानक ते तक्का या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खाजगी बसेस उभ्या राहत आहेत. यामुळे वाहतूक व रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रभाग समिती ड चे सभापती तेजस कांडपिळे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल शहर वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी अभिजित मोहिते यांना निवदेन दिले आहे.
पनवेल रेल्वेस्थानकाकडून अरुणोदय चौक ते पिर जमाल शहा दर्गा हा रस्ता तक्का गावाकडे जातो. या ठिकाणी इतर वाहनांची सतत ये-जा सुरू असते. त्याचबरोबर सकाळच्या प्रहरी स्थानिक रहिवासी मॉर्निंग वॉकला जातात. एकंदरीत तक्का येथील रहिवाशांकरिता हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. असे असताना या ठिकाणी खाजगी कंपन्याच्या बसेस उभ्या केल्या जातात. विशेष करून रात्रीच्या वेळी या रोडला चक्क पार्किंगचे स्वरूप प्राप्त होते. या व्यतिरिक्त सुटीच्या दिवशी तर दुतर्फा बसेस उभ्या असतात. त्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत आहे. येथे जागाच राहत नसल्याने वाहतूक कोंडी होते, तसेच बसेस धुताना पादचार्यांच्या अंगावर पाणी उडत असल्याच्याही तक्रारी येत आहेत.
वर्दळीच्या ठिकाणी करण्यात येणार्या या बेकायदेशीर पार्किंगबाबत स्थानिक नगरसेवक म्हणून प्रभाग समिती ड चे सभापती तेजस कांडपिळे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी याबाबत पनवेल शहर वाहतूक शाखेकडे तक्रार केली आहे. संबंधितांवर कारवाई करून अरुणोदय चौक ते पिर जमाल शहा दर्गा हा रस्ता मोकळा करावा, अशी मागणी कांडपिळे यांनी केली आहे.