पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शनिवारी (दि. 3) झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे प्रवीण पाटील यांची बिनविरोध निवड झाली. विरोधी पक्षाचे बबन मुकादम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जाहीर केले. पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची मुदत 30 जून रोजी संपली. त्यामुळे या पदासाठी शनिवारी दुपारी 12 वाजता निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी सत्ताधारी पक्षातर्फे भाजपचे प्रवीण पाटील आणि विरोधी पक्षाकडून शेकापचे बबन मुकादम असे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शनिवारी दुपारी 12 वाजता पालिका सभागृहात स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीला सत्ताधारी पक्षाचे सर्व सदस्य हजर होते. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आणि विजय खानावकर गैरहजर असल्याने मुकादम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर निर्वाचन अधिकार्यांनी पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले. या निवडीबद्दल आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, माजी स्थायी सभापती अमर पाटील, मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील व स्थायी समितीच्या सदस्यांनी प्रवीण पाटील यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.