उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील पाणदिवे येथील
पूर्वेकडील जंगलात गावठी दारूच्या हातभट्टीवर उरण पोलिसांनी धाड टाकली असून, हातभट्टीची गावठी दारू निर्मिती करणार्या साहित्यासह हजारो रुपये किमतीचे द्रावण जप्त करण्यात आले आहे, मात्र हातभट्टीची दारू तयार करणारे दोन आरोपी फरार झाले आहेत. उरण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्याच्या पूर्व विभागातील पाणदिवे येथील पूर्वेकडील जंगलात गावठी हातभट्टी दारूची निर्मिती होत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक निलेश तांबे व गणेश कराड यांच्या पथकाने सापळा रचून हातभट्टी दारूची निर्मिती होत असलेल्या पाणदिवे येथील जंगलात धाड टाकली. त्यावेळी हातभट्टी निर्मिती करणारे दोन इसम त्या ठिकाणाहून फरार झाले, परंतु हातभट्टीच्या जवळपास आढळून आलेल्या अॅक्टिवा बाइकच्या क्रमांकावरून दारू निर्मिती करणारे पाणदिवे येथील इसम जयेंद्र ठाकूर व कुंदन ठाकूर यांच्या विरोधात मु. प्रोव्ही 65 (ई)(फ) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी पोलिसांनी 64 हजार रुपये किमतीचे आठ ड्रममध्ये भरलेले गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे द्रावण, तसेच 16 हजार रुपये किमतीच्या 200 लिटर गावठी हातभट्टी दारूसह एक हजार रुपये किमतीची एक गॅस शेगडी व 500 रुपयांचे जर्मन धातूचे पातेले असे एकूण सुमारे 81 हजार 500 रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. गावठी हातभट्टी दारूची निर्मिती करणारे फरार आरोपी जयेंद्र ठाकूर व कुंदन ठाकूर यांचा पोलीस शोध घेत आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.