पेण : प्रतिनिधी
आमदार रविशेठ पाटील यांची जन्मभूमी असलेल्या रावे गावाचे नंदनवन करणार असल्याची ग्वाही रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 25) रावे येथे दिली. आमदार रविशेठ पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपये खर्चून रावे गावातील मराठी शाळा ते रायबादेवी मंदिर या अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन वैकुंठ पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार रविशेठ पाटील यांनी रावे गावासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे वैकुंठ पाटील यांनी यावेळी सांगितले. आमदार रविशेठ पाटील यांनी रावे गावातील खाडीकिनार्यावरील शेतीचे नुकसान थांबविण्यासाठी पूरनियंत्रक संरक्षक भिंतीसाठी 17 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. गावातील तलाव सुशोभीकरणसाठी 25 लाख, स्मशानभूमी रस्तासाठी 10 लाख, रायबादेवी मंदिराकडे जाणार्या रस्त्यासाठी पाच लाख, अस्थीविसर्जन घाटसाठी 10 लाख, मच्छी सुकणाविण्याच्या ओट्ट्यासाठी पाच लाख, टाकपाडा आळी येथील सार्वजनिक शौचालयसाठी पाच लाख, समाज मंदिरसाठी 10 लाख असा एकूण एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या विकास कामामुळे रावे गावचे नक्कीच नंदनवन होईल, असा विश्वास वैकुंठ पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. परिसरातील दादर गावासाठीदेखील सुमारे एक कोटी रुपयांची विकासकामे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सरपंच संध्या पाटील, माजी उपसरपंच राजश्री पाटील, ग्रामपंचायत सदस्य सरिता पाटील, धनाजी पाटील, प्रदीप पाटील, अजित पाटील, राजन पाटील, किशोर पाटील, योगेश पाटील, निवृत्ती पाटील यांच्यासह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.