


महाड : प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे महाडमध्ये मंगळवारी आलेल्या पुराने व्यापार्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पुराने महाडकर नागरिकांच्या 2005मधील महापुराच्या स्मृती जाग्या झाल्या. महाडजवळून वाहणार्या सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांनी मंगळवारी रौद्ररूप धारण केले. शहरात ज्या भागात पाणी शिरण्याची शक्यता नव्हती त्या भागातही पाणी शिरल्याने एकच गोंधळ उडाला. पुरामुळे घरात अडकलेल्या लोकांना नगर परिषदेच्या आपत्कालीन यंत्रणेच्या होड्यांनी बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविलेे. महाड शहरातील जवळपास 200 नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. त्यानंतर काही वेळातच एनडीआरएफचे पथक दाखल झाले. यामध्ये 24 जवानांचा समावेश होता. त्यांना औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कारखान्यांतील कामगारांना बाहेर काढण्यासाठी पाचारण करण्यात आले. भारतीय सैन्य दल आणि कोस्टगार्ड यांचे पथक रात्री एकच्या सुमारास दाखल झाले, मात्र या पथकाला बचावकार्य करता आले नाही. उलट रायगड मार्गावर तेटघर येथे पुराच्या पाण्यातून वाट काढताना सैन्य दलाचा एक ट्रक कलंडला. त्याला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. भोराव येथून वाहत जाणार्या दोन युवकांना स्थानिक नागरिकांनी वाचविले. रेलिश गार्डन या हॉटेलमध्ये अडकलेल्या सहा लोकांना एनडीआरएफ आणि खासगी बोटीने वाचविण्यात आले, तर लाडवली पुलावरून स्थानिक तरुणांनी जवळपास 100 लोकांची सुटका करून बचावकार्य केले, मात्र रायगड विभागातील नागरिकांना वाचविण्यासाठी कोणतेही बचाव पथक पोहचू शकले नाही.