खालापूर : प्रतिनिधी
देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या भारतीय सैन्याप्रती प्रत्येकालाच अभिमान असतो. याच भावनेतून खोपोली आणि परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिकांना पाठविण्यासाठी तब्बल 1200 राख्या आणि शुभेच्छा संदेश जमा केले आहेत. सैनिक आणि नागरिक यांच्यातील अतूट बंधनाचे हे प्रतीक आता लष्करापर्यंत पोहोचवले जाणार आहे.
खोपोलीतील सहजसेवा फाऊंडेशन आणि लायन्स क्लब या संस्थांतर्फे ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. येत्या 15 ऑगस्ट 2019 रोजी रक्षाबंधन आहे. तत्पूर्वी राख्यांचे संकलन करणे आणि त्या राख्या सैन्य दलातील अधिकार्यांकडे पोच करणे असा या उपक्रमाचा हेतू होता. वरवणे (ता. पेण) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, तसेच खोपोलीतील जनता विद्यालय, सह्याद्री विद्यालय, शिशु मंदिर, कॉम्प्युटर पॉईंट यांच्या विद्यार्थ्यांकडून 1200 राख्या, संदेश पत्रे व शुभेच्छा पत्रे संकलित करण्यात आली. या राख्या, संदेश व शुभेच्छा पत्रे खोपोली नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत वाटलेल्या कापडी पिशव्यात भरून गुरुवारी (दि. 8) नगराध्यक्षा सुमन औसरमल, मुख्याधिकारी गणेश शेटे, नगरसेवक मोहन औसरमल यांच्या हस्ते माजी सैनिक प्रकाश महाडिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. प्रकाश महाडिक यांच्या माध्यमातून या राख्या भारतीय लष्करापर्यंत 15 ऑगस्टपूर्वी पोचविल्या
जाणार आहेत.
खोपोली नगर परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे अध्यक्ष सुजित पडवळकर, राकेश ओसवाल, सोमनाथ हेगडे, प्रोजेक्ट चेअरमन पल्लवी पडवळकर, आशा देशमुख, फाऊंडेशनचे अध्यक्ष शेखर जांभळे, संतोष गायकर, पूनम तेलवणे, निरंजन भोजागोल, जयश्री भागेकर, एलिझाबेथ वॉल्टर, हैबती जाधव, मोहन गोतपागर आदी उपस्थित होते.