पनवेल : वार्ताहर
कोरोनोचा प्रादुर्भाव वाढु नये, या करीता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे काहीजण जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून चढ्या भावाने कालांतराने विक्री करण्याच्या मानसिकतेत असल्याचा संशय पनवेलचे तहसिलदार अमित सानप यांनी व्यक्त केला. तसेच जे जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करतील त्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असे देखील त्यांनी या वेळी बोलताना सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, मी एवढ्यावर न थांबता संबधित व्यापारी साठेबाज यांची कायदेशीररित्या गोडाऊन सिल करीन असा गर्भित इशारा त्यांनी या वेळी बोलताना दिला, कुणीही मला पुराव्यानिशी माहिती दिली तर संबधितांचे नाव गुप्त ठेवून साठेबाजीला तत्काळ लगाम घालण्यात आमची यंत्रणा सक्षम आहे. नागरिकांनी घाबरून न जाता या संकटाचा मुकाबला एकजुटीने व संयम ठेवून करावयाचा आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये या करीता शासन प्रयत्नशील आहे, फक्त जनतेच्या सहकार्याची गरज आहे. लहान मुले व वृद्धांची काळजी घ्या, महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडा अन्यथा आपल्या परिवारासोबतच घरात रहा, असे आवाहनही तहसिलदार अमित सानप यांनी समस्त पनवेल तालुक्यातील जनतेला केले आहे.