पाली ः वार्ताहर
वाकण पाली राज्य महामार्गावर वझरोली गावाजवळ विद्युत वाहिन्यांवर झाड कोसळून विजेचा खांब कोसळला. यामुळे विजेच्या जिवंत वाहिन्या रस्त्यावर आडव्या येऊन लोंबकळत होत्या. परिणामी येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वीज वाहिन्यांवर रस्त्याच्या शेजारील शेतात असलेले झाड उन्मळून कोसळले. त्यावेळी येथून एक कार जात होती. सुदैवाने कार थोडी पुढे गेली आणि वाहिन्या खाली आल्या आणि संपूर्ण रस्ता व्यापला. या वेळी कारमधील लोकांनी ताबडतोब प्रसंगावधानता दाखवून दोन्ही बाजूने येणारी वाहने थांबविली. त्यामुळे या मार्गावर काही काळ मोठ्या वाहनांची कोंडी झाली होती. या वेळी पत्रकारांनी ताबडतोब वीज महावितरण पालीचे उपकार्यकारी अभियंता गोविंद बोईने यांना भ्रमणध्वनी करून वीज वाहिन्या तुटल्याची घटना सांगितली असता त्यांनी ताबडतोब वाहिन्यांचा प्रवाह बंद करून दुरुस्तीसाठी कर्मचारी पाठविले व वाहिन्या दुरुस्त केल्या.