कर्जत ः बातमीदार
प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान पर्यटकांसाठी खुले झाल्यानंतर आता नेरळ-माथेरान टॅक्सीसेवाही शुक्रवार (दि. 4)पासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेल्या 450 टॅक्सीचालकांना दिलासा मिळाला आहे.
नेरळ गावातील तरुणांनी 1985मध्ये नेरळ-माथेरान घाटरस्त्यावरून पर्यटक प्रवाशांना माथेरान दस्तुरी नाका येथे नेण्यासाठी टॅक्सीची प्रवासी वाहतूक सुरू केली. सध्या या मार्गावर 300 प्रवासी टॅक्सी असून, त्यावर 450 चालक काम करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 17 मार्चपासून माथेरान पर्यटनस्थळ बंद केले होते. तेव्हापासून नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर पर्यटकांची वाहतूक बंद झाली होती. परिणामी टॅक्सी सेवादेखील बंद होऊन पर्यटनाबरोबरच टॅक्सी व्यवसाय 100 टक्के ठप्प होता.
अखेर शासनाने माथेरान पर्यटनस्थळ 1 सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेची विशेष बैठक घेण्यात आली. त्यात 100हून अधिक टॅक्सी मालक आणि त्याहून अधिक चालक उपस्थित होते. सर्वांना व्यवसाय मिळाला पाहिजे यासाठी नंबरप्रमाणे टॅक्सी सुरू करण्याचे धोरण बैठकीत निश्चित करण्यात आले. एकाच वेळी माथेरान दस्तुरी नाका आणि नेरळ येथील प्रवासी वाहतूक
सुरू करण्यावर एकमत झाले. त्यानुसार शुक्रवारपासून टॅक्सीसेवा सेवेत दाखल झाली आहे.
पर्यटकांसाठी कर्जत-कल्याण राज्यमार्गावर प्रवासी टॅक्सी थांबवून ठेवण्यात आल्या असून, पर्यटकांसाठी नेरळ-माथेरान टॅक्सी संघटना सज्ज आहे.
-प्रवीण पोलकम, टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष