लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त
लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल गेली अनेक वर्ष डोळ्यांच्या आरोग्य विषयक अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित असते. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन राष्ट्रीय अंधत्व निवारणाच्या कार्यात हातभार लागावा हाच उद्देश या उपक्रमामागे असतो. म्हणूनच लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जागतिक नेत्रदान पंधरवडयानिमित्त रविवारी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल ते व्ही. के. हायस्कूल पनवेलपर्यंत नेत्रदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची सुरुवात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. रॅलीची सुरुवात लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल येथून झाली असून रॅलीचा समारोप वडाळे तलाव येथे झाला. ही रॅली रोटरी क्लब, लायन्स क्लब, इनरव्हील क्लब या सामाजिक संस्थाच्या सहभागाने आयोजित केलेली होती. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रॅलीसह आयोजकांचे कौतुक केले. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक राजू सोनी, भाजप पळस्पे जि. प. विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटचे मेडिकल डायरेक्टर डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्यासह लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्य, डॉक्टर, कर्मचारी आदींनी या रॅलीत सहभाग घेतला होता. आजघडीला देशात लाख रुग्ण हे कॉर्नियल (बुबुळाचे) अंधत्वाचे आहेत. त्यामध्ये दरवर्षी सुमारे रुग्णांची भर पडते. आणि यामध्ये लहान मुले व तरुण वर्गाचे प्रमाण जास्त आहे. आपल्याकडे आता सुसज्ज नेत्र रुग्णालय व तंज्ञ डॉक्टर आहेत, परंतु नेत्रदान करणारे खूपच कमी असल्यामुळे गरजू रुग्णांना दृष्टी पुन्हा मिळू शकत नाही. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नेत्रदान विषयक जनजागृती करून नेत्रदानाचे प्रमाण वाढण्यासाठी आपण सर्वांनी नेत्रदान हीच आपली परंपरा केली पाहिजे, असे मत लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटचे मेडिकल डायरेक्टर डॉ. सुहास हळदीपूरकर यांनी व्यक्त केले.