नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्राने संपूर्ण राज्यात 170 पुलवजा बंधारे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून या कामांमुळे महाराष्ट्राचे दुष्काळी चित्र पालटणार आहे, असा विश्वास केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण समारंभात व्यक्त केला. जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्राला पहिला राष्ट्रीय जल पुरस्कार श्री गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे जलसंपदा आणि जलसंधारण मंत्री गिरीश महाजन, जलसंवर्धन व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे, कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय जलसंपदा, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण समारंभात श्री. गडकरी बोलत होते. या वेळी श्री. गडकरी म्हणाले की, पाण्याचा अचूक वापर व योग्य नियोजन महत्त्वाचे बनले असून पाण्याच्या नियोजनवरच देशाचा विकास अवलंबून आहे. जलसंधारण क्षेत्रात जनजागृती करण्याच्या उद्देशाने जल पुरस्काराची सुरुवात केली आहे, असे सांगून ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये जलसंधारण क्षेत्रात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. राज्य शासनाने नुकतेच 170 पुलवजा बंधारे बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून यामुळे महाराष्ट्राचे चित्र पालटणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे या भागात पाण्याचे साठे निर्माण झाले आहेत. सरकारने तयार केलेली बळीराजा योजनाही शेतकर्यांच्या हिताची ठरत आहे, असेही श्री. गडकरी या वेळी म्हणाले.
– महाराष्ट्राला 10 राष्ट्रीय जल पुरस्कार देशपातळीवरील पहिल्या राष्ट्रीय जल पुरस्कारासह महाराष्ट्राला विविध श्रेणींमध्ये 9 पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये अहमदनगर, लातूर, बीड, वर्धा या जिल्ह्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.