लक्ष्मी आय केअर इन्स्टिट्यूटचा उपक्रम
पनवेल ः बातमीदार
पनवेलच्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टने ठाणे व रायगड जिल्ह्यातील 72 नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला. इन्स्टिट्यूटच्या टीमने हा दिवस मिशन दृष्टीसाठी दिला असून मेडिकल डायरेक्टर डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच दिवशी 72 मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या.
ठाण्यातील मुरबाड, शहापूर, बदलापूर, कर्जत तसेच रायगडमधील पनवेल, उरण, माणगाव व तळा या तालुक्यातून शंभरहून अधिक नागरिक गुरुवारी (दि. 15) या मिशन दृष्टीमध्ये सहभागी झाले होते.
मिशन दृष्टीविषयी अधिक माहिती देताना लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटचे संचालक व प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर म्हणाले, जागतिक आरोग्य संघटना व अंधत्व नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रमाच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये दृष्टी गमावलेले एक कोटी 20 लाख अंध नागरिक आहेत व यापैकी 80 टक्के नागरिकांना मोतीबिंदूमुळे अंधत्व आले आहे. आजही दरवर्षी 38 लाख भारतीय नागरिक मोतीबिंदूच्या आजारामुळे पर्शियल (एका डोळ्याने) अथवा दोन्ही डोळ्यांनी अंध होत आहेत. वयाच्या चाळीशीतच दृष्टी कमी होण्याच्या तक्रारी आहेत. यासाठी हा उपक्रम राबविल्याचे डॉ. हळदीपूरकर यांनी स्पष्ट केले.