Breaking News

वाहनचालकास लुटणारे गजाआड; पनवेल शहर पोलिसांची कारवाई

पनवेल : वार्ताहर – पनवेल शहरालगतच असणार्‍या उड्डाणपुलावर एका रुग्णवाहिका चालकाला लुटणार्‍या अज्ञात आरोपींना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखे पथकाने गजाआड केले असून त्यांच्याकडून दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर या टोळीतील आरोपी हे उरण येथील असून तेथील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. यातील एका आरोपीवर सन 2002 पासून आत्तापर्यंत उरणमध्ये सात गुन्हे दाखल आहेत.

काही दिवसांपूर्वी पनवेल शहराजवळील विजय सेल्स समोरील उड्डाणपुलावर चढण्याच्या मार्गांवर आपल्या ताब्यातील 108 क्रमांकाची रुग्णवाहिका घेऊन गजानन बाबाजी वळवी (41) हे जात असताना रुग्णवाहिका बंद पडली म्हणून बाजूला उभे होते. याचवेळी याठिकाणी रिक्षा (क्र. एमएच 46 एझेड 5108) मधून बंडाप्पा शिवानंद वीरशेट्टी (40 रा. इंदिरानगर झोपडपट्टी) दयाशंकर श्रीरंग राऊत (30), राजेश शंकर राठोड (32) दोन्ही रा. उरण (सध्या रा. पनवेल बसस्टॅण्ड ब्रिजखाली) हे तिथे आले आणि त्यांनी गजानन वळवी यांच्याशी झटापट करून त्यांच्याकडील एमआय कंपनीचा 5000 रुपये किमतीचा मोबाइल, अ‍ॅपल कंपनीचा 20 हजार रुपये किमतीचा आयपॅड आणि खिशातील चॉकलेटी रंगाच्या पाकीटासह त्यातील 18 हजार रुपये अशी रोकड असा एकूण 43 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या वेळी गजानन वळवी यांनी तत्काळ पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली तक्रार दाखल केली. आरोपींना फिर्यादी हे ओळखत नसल्यामुळे पोलिसांसमोर या आरोपींना पकडण्यासाठी मोठे आव्हान उभे राहिले होते.

या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, पोलीस निरीक्षक गुन्हे विजय तायडे, प्रशा शत्रुघ्न माळी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेप्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, उपनिरीक्षक सुनिल तारमळे, हवालदार वाघमारे, आयरे, नाईक वाघमारे, शिंदे, शिपाई गर्दनमारे, घुले, परासुर, नाईक खेडकर, शिपाई आव्हाड, नाईक माने, चौधरी, पवार यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरु केला.

त्यानुसार बंडाप्पा शिवानंद वीरशेट्टी (40 रा. इंदिरानगर झोपडपट्टी पनवेल) यास प्रथम अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक लाख 25 हजार रुपये ऑटो रिक्षा, 20 हजार रुपये पल आयपॅड, पाच हजार रुपयांचा मोबाइल असा एकूण एक लाख 50 हजार रुपयांचा माल हस्तगत  करण्यात आला त्यानंतर उर्वरित आरोपी दयाशंकर श्रीरंग राऊत (30), राजेश शंकर राठोड (32) दोन्ही रा. उरण (सध्या रा पनवेल बसस्टॅण्ड ब्रिजखाली) यांना सापळा रचून अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल तारमळे करीत आहेत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply